
बेलगांम प्राईड/ मराठी सन्मान यात्रेच्या पुढील नियोजनासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती (सीमाभाग) यांची महत्त्वाची बैठक आज मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके होते.
बैठकीच्या सुरुवातीला कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करत बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. प्रजासत्ताक दिनी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी २५० सीमावासीय कार्यकर्त्यांनी सहभाग घेत उपक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
मराठी गौरव दिनाचे औचित्य साधून येत्या शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून मराठी सन्मान यात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर बाईक रॅलीद्वारे सुळगा (ये.) मार्गे येळ्ळूर येथे आगमन होणार असून गावात बाईक रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर येळ्ळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठी सन्मान यात्रेची जाहीर सभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी दिली. पुढील टप्प्यांतील यात्रा कार्यक्रम वेळोवेळी माध्यमांद्वारे कळविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय सर्वोच्च न्यायालयात येत्या १६ फेब्रुवारीपासून त्रिसदस्यीय खंडपीठ पुन्हा उपलब्ध होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सीमाप्रश्नी न्यायालयीन कामकाजाला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असा ठराव संमत करण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने यासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचेही नमूद करण्यात आले.
तसेच ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी प्रगतशील लेखक संघाच्या साहित्य संमेलनात सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी सीमाभागात एक लाख सह्यांची मोहीम राबविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला पाठिंबा देत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती (सीमाभाग) या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणार असल्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला.
या बैठकीस शिवाजी हवळाणाचे, अशोक घगवे, मोतेश बारदेशकर, इंद्रजीत धामणेकर, शशिकांत सडेकर, सुरज जाधव, श्रीकांत नांदुरकर, अभिषेक कारेकर, निलेश काकतकर, रोहित जाधव, ओमकार जाधव, साईराज कुगजी, सविता राऊत, अभिजीत मजुकर, प्रतीक गुरव, रणजित हवळाणाचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचा समारोप उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांनी आभार प्रदर्शनाने केला.




