Uncategorized
Trending

राजहंस गडावर मराठी अस्मितेचा भव्य जयघोष; कुसुमाग्रज जयंतीनिमित्त मराठी भाषादिन सोहळा 

बेलगाम प्राईड/ सीमाकवी यांचा ‘भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल’ संदेश, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर सीमाभागातील मराठी बांधवांची एकीची वज्रमुठ आवळण्याची शपथ “भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल; आणि संस्कृती टिकली तरच आपली अस्मिता जिवंत राहील!” असा प्रेरणादायी संदेश सीमाकवी रवींद्र पाटील यांनी दिला.

मराठी राज्यभाषा दिन तसेच ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने ऐतिहासिक राजहंस गडावर भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीसमोर मराठीचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात गडावरील श्री सिद्देश्वर मंदिरात पूजा-अर्चा करून झाली. माजी एपीएमसी सदस्य व येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते वामनराव पाटील, महेश जुवेकर, धनंजय पाटील, राजू पावले, अशोक घगवे आदींच्या हस्ते पूजा करण्यात आली.

यानंतर शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पदपूजन करण्यात आले. सिद्दाप्पा पुजारी यांनी मंत्रोच्चार केले. खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, नगरसेवक व युवा समिती सीमाभागचे खजिनदार शिवाजी मंडोळकर, पांडुरंग सावंत, महादेव येळवी, शिवाजी जाधव, गुणवंत पाटील, रवी पाटील, संजय मोरे, एम. वाय. घाडी आदी मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे सीमाकवी रवींद्र पाटील यांनी मराठीची अभिजात परंपरा, संतसाहित्याचा वारसा आणि सीमाभागातील मराठी बांधवांची जिद्द यांचा गौरव केला. राजहंस गडावर दुमदुमलेला मराठीचा जयघोष हा केवळ उत्सव नसून मराठी अस्मितेचा जाज्वल्य संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी सादर करत सीमाभागातील मराठी भाषिक अन्यायाविरुद्ध लढत असल्याचा उल्लेख केला. “मराठी माणूस हा इथला भूमिपुत्र असून ही जमीन त्याच्या हक्काची आहे; त्यामुळे आपल्या हक्कासाठी एकीची वज्रमुठ आवळली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

शिवसंत संजय मोरे यांनी शिवाजी महाराजांनी मराठी शब्दकोष निर्माण करून राज्यकारभार मराठीत चालविला, ही मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. जागतिक स्तरावर दहाव्या क्रमांकावर असलेली मराठी भाषा वैज्ञानिक भाषा म्हणून अधिक बळकट झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी अनेक मान्यवरांनी समयोचित भाषणे करून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच १५ मार्चपासून सुरू होणाऱ्या मराठी सन्मान यात्रेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले, तर युवा समिती सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी आभार मानले. या सोहळ्यास सीमाभागातील अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!