सर्वांना मोठ बनवणं माझी इच्छा आहे, इतरांना तुडवण्याचा माझा स्वभाव नाही” : लक्ष्मी हेब्बाळकर

बेलगाम प्राईड/ मी स्वतः वाढणे आणि इतरांनाही वाढवणे यावर माझा विश्वास आहे; पण मी वाढून इतरांना तुडवण्याचा माझा स्वभाव नाही, असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेंबाळकर यांनी सांगितले.
हिरेंबागेवाडी येथे रविवारी सायंकाळी बाल विकास अकादमीचे नवनियुक्त अध्यक्ष अडिवेश इटगी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. वाढून इतरांना तुडवणाऱ्यांना देवही पसंत करत नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणे हा माझा स्वभाव आहे. खरे कार्यकर्ते आणि नेते ओळखून त्यांना पुढे आणणारेच खरे नेते असतात, असे त्यांनी सांगितले.
मंत्री म्हणून काम करण्याची मोठी जबाबदारी मला माझ्या ग्रामीण मतदारसंघातील जनतेने दिली आहे. तीन विभागांमुळे राज्यातील ७० ते ८० टक्के जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. राज्यात बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे नाव अग्रस्थानी राहील, असे काम करीन. मी जे सांगते ते करते आणि जे करते तेच सांगते. सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन पुढे जाईन, असे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा बाळगणारेच खरे हिंदू आहेत. मी १५४ मंदिरे, ३१ आंबेडकर भवन, अनेक शादी महाल, जैन बसदी आणि प्रार्थनागृहांचे जीर्णोद्धार केले आहेत. काही जण फक्त हिंदू म्हणून भाषणे देतात; पण मी प्रत्यक्ष काम करते. केवळ भाषण करून कोणी हिंदू होत नाही. आपण दगडाची, वाऱ्याची, अग्नीची आणि सर्व वस्तूंची पूजा करतो; मग इतर माणसांचा द्वेष करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित केला.
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले की, फक्त स्वतः वाढून नेता होता येत नाही. समाजातील कार्यकर्त्यांना ओळखून त्यांना जबाबदारी देऊन वाढवावे लागते. असा विशाल हृदयाचा स्वभाव लक्ष्मी हेब्बाळकर यांचा आहे. देवाने त्यांना सर्व कामे करण्याची शक्ती दिली आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या त्यांना भविष्यातही पाठिंबा देऊन आमदार म्हणून कायम ठेवावे, असे त्यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमास विविध मठांचे स्वामी, धार्मिक नेते, स्थानिक गावांतील शेतकरी नेते, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




