चांगल्या वर्तनाबद्दल बेळगाव मध्यवर्ती कारागरातील चार कैद्यांची मुदतपूर्व सुटका

बेलगाम प्राईड / बेळगाव मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या चार कैद्यांची चांगल्या वर्तनाबद्दल शनिवार दि. 26 रोजी सुटका करण्यात आली. कर्नाटक सरकारच्या आदेशाद्वारे तसेच कर्नाटक राज्य कारागृह आणि सुधारणा सेवा महासंचालकांच्या सूचनेनुसार ही कार्यवाही करण्यात आली. हे चार कैदी हे कारागृहात उत्कृष्ट काम आणि चांगले वर्तन याचे प्रदर्शन केल्यामुळे कारागृह सल्ला मंडळाने सुटकेसाठी त्यांची शिफारस केली होती. सुटका झालेल्या चार कैद्यांना कारागृहाचे सहायक अधीक्षक मल्लिकार्जुन कोण्णूर यांनी सुटका प्रमाणपत्र वितरित केले.
यावेळी बोलताना त्यांनी सदर कैद्यांनी विविध विभागात चांगले काम केल्याबद्दल गौरवोद्गार काढले. यापुढेही त्यांनी चांगली वर्तणूक कायम ठेवून चांगले नागरिक बनण्याचा आणि कुटुंबाला वेळ देण्याचा सल्ला दिला. शांती, अहिंसा, सलोखा आणि कायद्याबाबत इतरांना देखील माहिती देण्याचे आवाहन केले. तसेच पुढील आयुष्य आनंदात जगण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विविध गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेले व्ही. प्रशांत, पुरुषोत्तम सोमय्या, महादेव हुलगन्नवर ,फैजूला वाजिदअली बारगीर यांची यावेळी सुटका करण्यात आली.यावेळी कारागृह अधिकारी राजेश धर्मट्टी, बसवराज बजंत्री, रमेश कांबळे तसेच कर्मचारी बी. एस. कडादी, विश्वनाथ असोदे, मल्लिकार्जुन उळागड्डी आदी उपस्थित होते.




