Uncategorized
Trending

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ‘त्या’ वृद्धाची निराधार केंद्रात रवानगी !

बेलगाम प्राईड /कुटुंबियांनी वाऱ्यावर सोडलेल्या एका असहाय्य वृद्धाची समाजसेविका माधुरी जाधव यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने निराधार केंद्रात रवानगी करण्यात आली. रमेश देशपांडे (वय ७७) असे त्या वृद्धाचे नाव आहे.

गेल्या पाच – सहा दिवसांपासून हा वृद्ध बेळगाव शिवाजी कॉलनीत भटकत होता. सदर बाब येथील सामाजिक कार्यकर्ते पवन कांबळे, संतोष दळवी, विक्रम कदम, विनय खांडेकर यांच्या लक्षात आली असता त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन वृद्धाची चौकशी केली. यावेळी त्याने आपल्याला दोन मुले आहेत परंतु त्यांची कोणतीही माहिती नाही. काही दिवसांपूर्वी धाकट्या मुलाने मला हिंडाल्को जवळ सोडले होते, असे सांगितले.

यानंतर सदर सामाजिक कार्यकर्त्यांनी तो वृद्ध राहत असलेल्या ठिकाणीही चौकशी केली, तरीही त्याच्या कुटुंबाला शोधण्यात अपयश आल्याने त्यांनी गेल्या पाच – सहा दिवसांपासून स्वखर्चातून त्याची व्यवस्था केली. मात्र पुढे चांगली व्यवस्था होण्याच्या उद्देशाने समाजसेविका माधुरी जाधव यांना सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच माधुरी जाधव यांनी जुने बेळगाव येथील निराधार केंद्राचे व्यवस्थापक रावसाब शिरहट्टी यांच्याशी संपर्क साधून त्या वृद्धाला निराधार केंद्रात दाखल करण्यासाठी सहकार्य केले.

यावेळी बोलताना समाजसेविका माधुरी जाधव यांनी जन्मदात्या वडिलांची काळजी असेल तर देशपांडे यांच्या मुलांनी त्यांना लवकरात लवकर घेऊन जावे अशी विनंती केली. तसेच याबाबत शहापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्याची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!