Uncategorized
Trending

गौंडवाड सामाजिक कार्यकर्त्याच्या खून प्रकरणी ५ आरोपींना जन्मठेप

बेलगाम प्राईड/ बेळगाव तालुक्यातील गौंडवाड येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील यांच्या खून प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर उर्वरित चार जणांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. गंगाधर यांनी हा निकाल दिला. शनिवारी सायंकाळी चार वाजता सर्व आरोपींना न्यायालयात हजर करत ही शिक्षा सुनावण्यात आली.

या खून प्रकरणात बेळगाव जिल्ह्यातील गौंडवाड येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश राजेंद्र पाटील (वय ४०) यांचा १८ जून २०२२ रोजी जांभियाने भोसकून खून करण्यात आला होता. भैरवनाथ मंदिराच्या जागेवरून झालेल्या वादामुळे ही घटना घडली होती. या प्रकरणी एकूण १० जणांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यापैकी ५ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ज्या पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यात आनंद रामा कुट्रे (वय ५५) अर्णव आनंद कुट्रे (वय ३२) जायाप्पा भैरु निलजकर (वय ५०) महांतेश जायाप्पा निलजकर (वय ३५) आणि शशिकला आनंद कुट्रे (वय ५०) यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला होता. याशिवाय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा झालेल्या पाच जणांना १३ लाखांहून अधिक दंड ठोठावला आहे. त्यापैकी १० लाख रुपये मयताच्या पत्नीला तर उर्वरित दंड त्याच्या आईला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अशी माहिती वकील शामसुंदर पत्तार यांनी माध्यमांना दिली.

या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने ॲड. शामसुंदर पत्तार आणि सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. जी. के. माहूरकर यांनी काम पाहिले. ही शिक्षा सुनावल्यानंतर जमलेल्या ग्रामस्थांनी न्याय मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. न्यायालयाबाहेर शेकडो महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते. शिक्षा सुनावताच महिलांनी हात वर करून आपला आनंद व्यक्त केला.

निकाल ऐकल्यानंतर मयत सतीश पाटील यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. रडत रडतच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की, ‘देवस्थानाला जमीन परत मिळावी यासाठी माझा नवरा प्रयत्न करत होता. त्याचा राग धरून त्याचा खून करण्यात आला. त्या आरोपींना आज जन्मठेप झाली. त्यासाठी मदत केलेल्या वकिलांचे आणि न्याय मिळवून देण्यासाठी सोबत राहिलेल्या ग्रामस्थांचे मी आभार मानते’. या खून प्रकरणात सतीश यांच्या पत्नीची साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली होती.

सतीशच्या खुनानंतर गौंडवाड परिसरात महिनाभर तणावाचे वातावरण होते. काही जणांच्या घरांवर हल्ले, तर वाहनांची जाळपोळ झाली होती. या घटनेनंतर काकती पोलीस ठाण्यात २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यापैकी १० जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर १५ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!