
बेलगाम प्राईड /कर्नाटकचे पोलीस महासंचालक (आयजीपी) आणि बेळगावचे माजी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी कोपनहेगन येथे आयोजित जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून आपल्या देशासह राज्याचा नावलौकिक वाढवला आहे.
डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे नुकतीच जागतिक ट्रायथलॉन स्पर्धा पार पडली. जगातील सर्वात खडतर स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेमध्ये विविध देशांमधील क्रीडापटूंचा सहभाग होता. समुद्रामध्ये 3.8 कि.मी. पोहणे, त्यानंतर लागलीच 180 कि.मी. सायकलिंग करणे आणि 42 कि.मी. धावणे हे तीन क्रीडा प्रकार एका दमात पूर्ण करणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. हे तीनही क्रीडाप्रकार आयजीपी संदीप पाटील यांनी केवळ 14 तास 45 मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करून स्पर्धेत सुयश मिळविले. खेळ आणि व्यायामाची आवड असणाऱ्या संदीप पाटील यांनी गेल्या जानेवारी महिन्यापासून कठोर परिश्रम घेत सदर जागतिक ट्रायथलॉन स्पर्धेची तयारी सुरू केली होती. कोपनहेगन येथील स्पर्धेतील यशामुळे त्यांच्या परिश्रमाचे चीज झाले असून त्यांचे हे यश युवा पिढीसाठी आदर्शवत ठरले आहे. यशाबद्दल पोलीस महासंचालक संदीप पाटील यांचे पोलीस व क्रीडा क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.




