
बेलगाम प्राईड / माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या खऱ्या अर्थाने “आयरन लेडी” होत्या. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी आहे, असे महिला व बालविकास मंत्री तसेच उडुपी जिल्ह्याच्या प्रभारी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
उडुपी जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने जिल्हा काँग्रेस भवनात शुक्रवारी इंदिरा गांधी पुण्यस्मरण व सरदार वल्लभभाई पटेल जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या.
मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, “इंदिरा गांधी माझ्या आयुष्याचा आदर्श आहेत. त्यांनी केवळ महिलांसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी एक दिशा दाखवली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर बलवान राष्ट्र म्हणून ओळख निर्माण केली. देशाच्या स्वावलंबनासाठी त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण, हरित क्रांती यांसारख्या अनेक ऐतिहासिक सुधारणा राबवल्या.”
त्या पुढे म्हणाल्या, “एक वेळ जेवण मिळणं कठीण असलेल्या काळात इंदिरा गांधींनी देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले. त्याग, शिस्त आणि दूरदृष्टी या गुणांमुळे त्यांचे नेतृत्व आजही आदर्श मानले जाते.”
काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, “देशाचे भविष्य काँग्रेस पक्षाशी जोडलेले आहे. उडुपी जिल्ह्यात पाच मतदारसंघांत पराभव झाला असला तरी काँग्रेस पक्ष अजूनही जिल्ह्यात मजबूत आहे.”
या कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला. मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, “विखुरलेल्या भारताला एकत्र आणण्याचे आणि अखंड भारत घडविण्याचे श्रेय सरदार पटेल यांना जाते. ते खऱ्या अर्थाने देशाचे एकात्मतेचे शिल्पकार आहेत.
या प्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अशोककुमार कोडवूर, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा ज्योती हेब्बार, नेते उदयकुमार शेट्टी, रमेश कांचन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.




