
बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक म्हणजे जिल्ह्यातील राजकीय प्रतिष्ठेची सर्वोच्च लढाई आहे. याच प्रतिष्ठेच्या संघर्षात आज काँग्रेस नेते तथा मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली गटाने निर्णायक खेळ खेळला आहे! बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि उपाध्यक्षपदी कागवाडचे आमदार राजू कागे यांची निवड झाली असून केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.
बेळगावच्या डीसीसी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीमुळे आज बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि कागवाडचे आमदार राजू कागे यांना जॅकपॉट लागला असल्याचे म्हटले आहे.
सकाळच्या सुमारास, माजी खासदार रमेश कत्ती यांनी अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांच्या घरी भेट दिली होती. दुसरीकडे, काल मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली 11 संचालकांची बैठक झाली होती. आज सकाळी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली गटात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार विश्वास वैद्य, एमएलसी चन्नराज हट्टीहोळी, विरुपाक्ष मामनी, नानासाहेब पाटील, निलकंठ कप्पलुगुद्दी, अप्पासाहेब कुलुगोडे, अण्णासाहेब जोल्ले आणि महांतेश दोड्डगौडर हे एकत्र आले होते. याचदरम्यान कागवाडचे आमदार राजू कागे यांनी आमदार लक्ष्मण सवदी यांची भेट घेऊन थेट जारकीहोळी गटाशी संपर्क साधला.
अध्यक्षपदासाठी अण्णासाहेब जोल्ले आणि उपाध्यक्षपदासाठी राजू कागे यांनी अर्ज दाखल करून शेवटच्या क्षणी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर जोल्ले आणि कागे यांची निवड निश्चित झाली असून, दुपारी अधिकृत घोषणा होणार असल्याचे म्हटले जात होते.
यावेळी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, “गेल्या 2-3 दिवसांपासून सदस्यांनी आमदारांशी चर्चा करून आज अंतिम निर्णय घेण्यात आला. जारकीहोळी गटाकडून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची अध्यक्षपदी आणि कागवाडचे आमदार राजू कागे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. यांचा कार्यकाळ 30 महिन्यांचा असेल. त्यानंतर काँग्रेसच्या व्यक्तीला अध्यक्ष-उपाध्यक्ष पद दिले जाईल.”
“कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू कागे यांनी आमची भेट घेतली आहे. ते पूर्वीपासून आमच्यासोबत आहेत आणि यापुढेही राहतील,” असे ते म्हणाले. “सहकारी तत्त्वावर, पक्षभेद बाजूला ठेवून अध्यक्षांची निवड झाली आहे. गेल्या वेळी त्यांनी आम्हाला अध्यक्षपद सोडले होते. आता 30 महिन्यांनी ते आम्हाला देतील. यात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अफवा खोटी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“जोल्ले यांना हरवल्याच्या आरोपावर, त्यांना निवडून आणून अध्यक्षपद देण्यात आले आहे. आमच्यासोबत असलेल्यांची साथ आम्ही सोडणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. 8 भाजपचे आणि 8 काँग्रेसचे सदस्य होते. अशोक पट्टण यांनीही अर्ज दाखल केला होता. अपेक्स बँकेतून कुरुब समाजाला प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.




