विजापुरे हार्मोनियम फाउंडेशनच्या तर्फे गुरुवर्य पं. रामभाऊ विजापुरे गुरुराज काटोटी यांच्या पुण्यतिथी निमित्त संगीत कार्यक्रम

बेलगाम प्राईड/ बुधवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ठीक ५:३० वाजता आय् एम् इ आर् च्या सभागृहात विजापुरे हार्मोनियम फौंडेशन, बेंगळूरु यांच्यातर्फे गुरुवर्य पं. रामभाऊ विजापुरे आणि प्रोफेसर गुरुराज काटोटी ह्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संगीताचा कार्यक्रम सादर होणार आहे. ह्यामध्ये श्रीमती आदिती प्रसाद ह्यांचे नृत्य, डॉ. आदित्य पल्लक्की ह्यांचे गायन आणि डॉ. दिलीप गायतोंडे ह्यांचे संवादिनी वादन होणार आहे. त्याचबरोबर ख्यात अभिनेता श्री. प्रसाद पंडित ह्यांचे गुरुमहिमा ह्या विषयावर व्याख्यान देखील होणार आहे. कार्यक्रमास रसिकांना प्रवेश खुला आहे.
कलाकारांचा परिचय:
अदिती प्रसाद: ए एन प्रसाद आणि वाग्देवी गुडी प्रसाद यांची कन्या, वास्तव्य बेंगळूरु. भरतनाट्यमची विद्यार्थिनी. गुरू श्रीमती वसुंधरा संपत कुमार यांची शिष्या. तिने कनिष्ठ आणि वरिष्ठ श्रेणी परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत आणि सध्या विद्वतची तयारी करत आहे. नुकतेच तिने आपले अरंगेत्रम पूर्ण केले असून ती समर्पण भावनेने आणि नम्रतेने या कला प्रकारातील सौंदर्य शोधत आहे. अदिती बंगळूरु येथील माउंट कार्मेल कॉलेजमध्ये संगणकीय जीवशास्त्र (कम्प्यूटेशनल बायोलॉजी) मध्ये बीएससी करत आहे.
डॉ. आदित्य पल्लक्की, बेंगळूरु येथील हिंदुस्तानी गायक कलाकार. ते होमिओपॅथी चिकित्सकही आहेत. श्रीमती मंगळंबा, काशिनाथ पत्तार, पंडित व्ही एम नागराज यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले आहे आणि सध्या पंडित डी कुमार दास यांच्या मार्गदर्शनाखाली ते शिक्षण घेत आहेत. पंचाक्षरी गवई, पुट्टराज गवई यांच्यासारख्या दिग्गजांनी केवळ संगीतच नव्हे तर अंध आणि अपंगांना जीवनाचे धडे जिथे दिले त्या गदग येथील वीरेश्वर पुण्याश्रमाच्या समृद्ध परंपरेचा त्यांना अभिमान आहे. डॉ. आदित्य यांनी कन्नड साहित्य आणि हिंदुस्तानी रागदारी पद्धती यांचा अनोखा मिलाफ करत, कन्नड बंदिशींच्या माध्यमातून भाषा आणि संगीतामध्ये असलेली कथित भिंत दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ. दिलीप गायतोंडे हे व्यवसायाने नेत्रशल्यविशारद असून ठाण्यात त्यांची तीन नेत्र चिकित्सा केंद्रे आहेत. प्रसिद्ध तबलावादक, पं. भाई गायतोंडे यांचे पुत्र असल्यामुळे दिलीप लहानपणापासूनच भारतीय शास्त्रीय संगीताच्या विविध प्रकारांच्या संपर्कात आले. १९७६ मध्ये, दिलीप यांनी भाईंचे जवळचे मित्र, पं. विश्वनाथ पेंढारकर यांच्याकडून संवादिनी वादन शिकणे सुरू केले. पेंढारकरजी यांनी त्या काळातील शास्त्रीय गायकांचा अभ्यास केला होता आणि दिलीप यांना “गायकी अंग” मध्ये प्रशिक्षण दिले. पं. पेंढारकरजी यांच्या अकाली निधनापर्यंत तब्बल २२ वर्षे हे शिक्षण सुरू होते. त्यानंतर दिलीप यांनी ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. शरद साठे यांच्याकडून राग संगीताचे प्रगत मार्गदर्शन घेतले. दिलीप यांना भाईंचे सहकारी, पं. नीलकंठबुवा अभ्यंकर आणि पंडिता जयमालाबाई शिलेदार यांच्याकडून अमोल असे मार्गदर्शन लाभले. दिलीप यांनी देवल क्लब, कोल्हापूर, भारत गायन समाज, पुणे, ठाण्यातील पं. राम मराठे संगीत महोत्सव आणि चेंबूर येथील एस. एस. अल्लादियाखान स्मृती महोत्सवात सादरीकरण केले आहे. नुकतेच दिलीप यांना गांधर्व महाविद्यालय, वाशी येथे विद्यार्थ्यांच्या प्रगत प्रशिक्षणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
सर्व कलाकारांना अंगद देसाई आणि महेश कानोले हे तबला साथ करतील आणि संवादिनी साथ तेजस काटोटी हे करतील.




