
बेलगाम प्राईड / भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीला उच्च पातळीवर नेण्यासाठी बेळगाव हॉकीचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना वेगवेगळ्या सेवा सुविधा देण्याकडे भर देण्याबरोबरच त्यांचा सराव हा प्रमुख दृष्टिकोन ठेवून बेळगाव हॉकी असोसिएशन काम करते. याचाच भाग म्हणून मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या हॉकी टीमच्या खेळाडूं सोबत बेळगाव हॉकीच्या खेळाडूंचा एकत्रित सराव सामना शनिवारी घेण्यात आला.
टिळकवाडी येथील लेले मैदानावर हा एकत्रित सरावाचा सामना शनिवारी सकाळी झाला. मराठा हॉकी संघाचे प्रशिक्षक श्रीकुमार आणि विजय पाटील तर बेळगाव हॉकीचे प्रशिक्षक सुधाकर चाळके आणि उत्तम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव सामना झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मराठा लाईट इन्फंट्रीच्या हॉकी खेळाडूंचा अनुभव आणि त्यांना मिळणारे प्रशिक्षण आणि त्यातून हॉकी खेळातील बारकाईने टिपण्याची संधी बेळगाव हॉकीच्या खेळाडूंना या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली.
बेळगाव हॉकीचे असंख्य खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकू लागले आहेत. त्या पातळीवर जाऊन आपला खेळ दाखवत असताना तो अधिक अचूक आणि प्रगत असला पाहिजे याची काळजी खेळाडूंना घ्यावी लागते. यासाठीचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ओळखून त्यांचे प्रशिक्षक काम करीत आहेत.
मराठाच्या खेळाडूंच्या पद्धती आणि इतर गोष्टी टिपणे महत्त्वाचे असते एकत्रित सामना खेळताना एकमेकांकडून शिकण्याची प्रक्रियाही पार पाडण्यात आल्याची माहिती यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक आणि माजी लष्करी अधिकारी सुधाकर चाळके यांनी दिली.




