
बेलगाम प्राईड :नवी दिल्ली / १२ ते १७ डिसेंबर २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथे झालेल्या ६९व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये बेळगावच्या हलकरे भगिनींनी जलतरणात नेत्रदीपक कामगिरी करत पुन्हा एकदा आपली चमक दाखवली आहे.
सुहास हलकरे आणि सुषमा हलकरे यांच्या कन्या सुनिधी हलकरे व समृद्धी हलकरे यांनी विविध जलतरण प्रकारांमध्ये एकूण ५ पदके– २ सुवर्ण, १ रौप्य व २ कांस्य पटकावत कुटुंबासह क्रीडाक्षेत्राला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली.
या स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरली २०० मीटर बॅकस्ट्रोक ही स्पर्धा. या स्पर्धेत हलकरे भगिनींनी जलतरण तलावात वर्चस्व गाजवले. १७ वर्षाखालील गटात समृद्धी हलकरे हिने सुवर्णपदक, तर १९ वर्षांखालील गटात सुनिधी हलकरे हिने रौप्यपदक जिंकले.
ही कामगिरी विशेष ठरते, कारण सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत पदक पटकावण्याचा मान हलकरे भगिनींनी मिळवला आहे. याशिवाय, दोन्ही भगिनींनी गया, बिहार येथे झालेल्या ७ व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्येही राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
सुनिधी व समृद्धी या दोघींचे प्रशिक्षण स्विमर्स क्लब ऑफ बेळगाव आणि अक्वेरियस स्विम क्लब ऑफ बेळगाव येथे, केएलईच्या ऑलिम्पिक आकाराच्या सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात प्रशिक्षण घेतात. त्यांना उमेश कलघटगी यांच्या मार्गदर्शनासह प्रशिक्षक अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंढके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर व इमरान उचगावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी ओम्स फिटनेस येथे ओंकार मोटार व मोनिका कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला जातो, तर दुखापत प्रतिबंध व पुनर्वसनाची जबाबदारी डॉ. बसवराज मोथीमठ सांभाळत आहेत.
सुनिधी हलकरे सध्या रवींद्रनाथ टागोर पीयू कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.एन. नाईक यांनी तिला नेहमीच प्रोत्साहन व पाठबळ दिले आहे. समृद्धी हलकरे ही ज्ञान प्रबोधन मंदिर आयसीएसई शाळेत शिक्षण घेत असून, शाळेच्या प्राचार्या मंजिरी रानडे व प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशामागे रोटरियन. अविनाश पोतदार, माणिक कपाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसणे, तसेच इतर अनेक शुभेच्छुकांचे अमूल्य सहकार्य लाभले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंबा व विश्वासामुळे हलकरे भगिनींना नवनवीन उंची गाठण्याची प्रेरणा मिळत आहे.




