
बेलगाम प्राईड / बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील इनामदार साखर कारखान्यात झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता सातवर पोहोचली आहे. उकळता द्रव पदार्थ अंगावर पडल्याने गंभीर भाजलेल्या आठ कामगारांपैकी तिघांचा बुधवारी मृत्यू झाला होता तर गुरुवारी उपचारादरम्यान आणखी चार कामगारांनी प्राण गमावले आहेत
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी कारखान्याच्या जनरल मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा सविस्तर तपशील सादर केला.
७ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास कारखान्याच्या बॉयलिंग हाऊसमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असताना ही हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत दीपक मुनवळ्ळी (३२, नेसरगी), अक्षय चोपडे (४८, रबाकवी), सुदर्शन बनोशी (२५, खानापूर), मंजुनाथ गोपाळ तेरदाळ (३१, अथणी), गुरुपादप्पा गिराप्पा तमण्णावर (३८, जमखंडी), भरतेश सारवाडी (२७, गोकाक) आणि मंजुनाथ मडिवाळप्पा काजगार (२८, बैलहोंगल) या सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. राघवेंद्र गिरीयाल या कामगाराची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासानुसार कारखान्याच्या व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५(२), २८९ आणि १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये जनरल मॅनेजर व्ही. सुब्बुतिनम (बेंगळुरू), इंजिनिअरिंग हेड प्रवीणकुमार टाकी आणि डेप्युटी जनरल मॅनेजर एस. विनोदकुमार (चामराजनगर) यांना आरोपी करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली असून रामदुर्ग डीएसपी आणि मुरगोड पीआय या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.




