महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मराठी सन्मान यात्रेसाठी व्यापक प्रयत्न

बेलगाम प्राईड/ सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्न जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने ‘मराठी सन्मान यात्रा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या यात्रेला यशस्वी करण्यासाठी युवा समितीने तयारीला वेग दिला असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडे अधिकृत सहकार्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दशकांपासून सीमाप्रश्नासाठी आंदोलने, मोर्चे, सत्याग्रह आणि विविध लोकशाही मार्गांनी लढा सुरू आहे. 2004 साली महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्न न्यायदानासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असली, तरी अद्यापही हा खटला प्रलंबित आहे. न्यायालयीन लढ्यासोबतच सीमावासीयांनी रस्त्यावरील संघर्ष कधीही थांबवलेला नाही, असे युवा समितीने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर मराठी अस्मिता, भाषा आणि संस्कृतीचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, तसेच सीमाप्रश्नाबाबत व्यापक जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने मराठी सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. विशेषतः युवकांमध्ये जागृती वाढवणे आणि लोकेच्छा अधिक बळकट करणे, हा या यात्रेचा मुख्य हेतू आहे.
मराठी सन्मान यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे पदाधिकारी मध्यवर्ती समिती, विविध घटक समित्या तसेच समिती नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून समन्वयातून कार्यक्रमाची दिशा ठरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती ही शिखर समिती असल्याने या उपक्रमाला तिचे मार्गदर्शन व सक्रिय सहकार्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
दरम्यान, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती ही युवा समितीच्या मराठी सन्मान यात्रेसाठी नेमके कितपत सहकार्य करणार, याकडे सीमाभागातील मराठी समाजासह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निर्णयावर यात्रेची व्याप्ती आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे राजकीय व सामाजिक वर्तुळात बोलले जात आहे.




