
प्रगती आढावा बैठकीत आवश्यक सूचना – खासदार शेट्टर
बेलगाम प्राईड/ बेळगावचे जिल्हाधिकारी श्री. महम्मद रोशन यांच्या उपस्थितीत, केंद्र सरकारच्या रेल्वे विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व विमानतळ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत माजी मुख्यमंत्री व बेळगावी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. जगदीश शेट्टर यांनी विविध विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.
रेल्वे विभागाकडे नव्या रेल्वे मार्गाच्या प्रगती बाबत चर्चा
बेळगाव–कित्तूर–धारवाड नवीन रेल्वे मार्गाच्या प्रगतीबाबत विचारणा केली असता सुमारे 1200 एकर जमिनीच्या भूसंपादनासंदर्भात आतापर्यंत सुमारे 407 एकर जमिनीसाठी शेतकऱ्यांना वाटप करण्याकरिता अंदाजे 149 कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला असून अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच राज्य सरकारकडून निधी मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर रेल्वे विभागाला जमीन हस्तांतरित करून निविदा प्रक्रिया सुरू करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर बेळगाव टिळकवाडी जवळील एल.सी. क्रमांक 381 परिसरात दुसरी लाईन टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहन वाहतूक मार्गात बदल करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे परवानगी मागितली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली व लवकरच काम सुरू केले जाईल असे सांगितले. त्याचप्रमाणे एल.सी. क्रमांक 382 व 383 जवळील उड्डाणपूल (रोड ओव्हर ब्रिज) बांधकामात काही अडथळे असून, ते लवकरच दूर करून काम सुरू केले जाईल, असेही कळविण्यात आले.
सुळेभावी गावाजवळ रेल्वे विभागाने बांधलेल्या उड्डाणपुलामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ये-जा व पीक वाहतुकीस अडचणी येत असल्याबाबत माहिती घेतली असता, या समस्यांवर तोडगा काढून लवकरच शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.
खानापूर जवळ रेल्वे विभाग उड्डाणपूल उभारत असून, मात्र बेळगावी वन विभागाकडून परवानगी न मिळाल्यामुळे काम सुरू होण्यास अडथळा येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी तात्काळ उप वनसंरक्षण अधिकारी, बेळगावी यांनी आवश्यक मंजुरी द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण :
बेळगाव–संकेश्वर मार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेले सहापदरी महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अधिकारी अधिक तत्परतेने काम करून ते तात्काळ पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
तसेच हलगा–मच्छे बायपास रस्त्याच्या कामाची अंतिम मुदत संपून एक वर्ष उलटले आहे. हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आले. बेळगाव–हुंगुंद–रायचूर रस्ता बांधकामाबाबत, फेज–1 अंतर्गत 43.8 किमी रस्त्याच्या कामासाठी आतापर्यंत 35 किमी लांबीच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित जमीन लवकरच संपादित करून काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.
विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक जमिनीची अपेक्षा
बेळगाव विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक जमीन भारतीय वायुदलाकडून मिळणे अपेक्षित आहे. मात्र वायुदलाचे अधिकारी योग्य प्रतिसाद देत नसल्यामुळे विकासकामे संथ गतीने सुरू असल्याची माहिती देण्यात आली. यावर संरक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येईल तसेच खासदार संसदीय संरक्षण समितीचे सदस्य असल्याने, समितीसमोरही हा विषय मांडून लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीस विशेष भूसंपादन अधिकारी श्रीमती जैनापूर, श्री. चौहान, श्रीमती कविता योगप्पनवर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. भुवनेश कुमार, तसेच विमानतळ प्राधिकरणाचे संचालक श्री. त्यागराजन उपस्थित होते, अशी माहिती माजी मुख्यमंत्री व बेळगावी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. जगदीश शेट्टर यांनी पत्रिका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.




