
बेलगाम प्राईड/ हलगा–मच्छे बायपास प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी बायपासविरोधात न्यायालयात लढा देणारे वकील तसेच बाधित शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावले होते.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बैठकी दरम्यान जमीन संपादन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणातील विविध बाबींचा अभ्यास करून पुढील दोन दिवसांत पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हलगा–मच्छे बायपासचे काम बेकायदेशी पद्धतीने सुरू आहे, याची सविस्तर माहिती वकील रविकुमार गोकाककर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
फिश मार्केटजवळ झिरो पॉईंट असताना चुकीच्या पद्धतीने नोटिफिकेशन काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच फिश मार्केट ते मच्छे रस्ता हा केवळ रुंदीकरणासाठी असताना, राष्ट्रीय महामार्ग एनएच-४ व एनएच-४ए यांना जोडण्याचा कोणताही उल्लेख नसतानाही बायपासचे काम सुरू असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.
याशिवाय या प्रकल्पासाठी अद्याप वर्क ऑर्डर जारी करण्यात आलेली नसतानाही काम सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकरी आणि वकिलांनी केला. त्यामुळे हे काम तात्काळ बंद करण्यात यावे, अशी ठाम मागणी बैठकीत करण्यात आली.या सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करून आगामी दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उपस्थितांना दिले.




