Uncategorized
Trending

तारांगण, जननी ट्रस्टतर्फे १४ रोजी कर्तृत्ववान महिलांचा गौरव

बेलगाम प्राईड/ जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजात स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी तारांगण व जननी ट्रस्टतर्फे १४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता ‘कर्तृत्वाचा कौतुक सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.

महिलांच्या जिद्द, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित केला जाणारा असून हा उपक्रम यंदा चौथ्या वर्षात प्रवेश करत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवलेल्या आठ कर्तृत्ववान महिलांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. कुटुंब, व्यवसाय आणि सामाजिक जबाबदाऱ्या यांचा समतोल साधत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पूनम हंगिरगेकर, स्वप्नांचा ध्यास घेत सातत्याने प्रगती साधणाऱ्या रूपाली गुरव, शिक्षण व विधी क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या ॲड. मनिषा भोसले, बेळगावमधील टाटा समूहाकडून पुरस्कार प्राप्त उद्योजिका दीपा भांदुर्गे यांचा यामध्ये समावेश आहे.

यासोबतच साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लेखिका-कवयित्री स्मिता किल्लेकर, पाककलेच्या माध्यमातून गृहउद्योग उभारून महिलांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या संजीवनी कुलकर्णी, छंद म्हणून सुरू केलेल्या केक बनवण्याच्या उपक्रमाला यशस्वी व्यवसायाचे रूप देणाऱ्या माधुरी दुर्गाडी तसेच चंदगड परिसरात सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत असलेल्या मनस्वी कांबळे यांचाही या वेळी सन्मान केला जाणार आहे.

हा सन्मान सोहळा शनिवार, १४ मार्च रोजी सरस्वती वाचनालयातील डॉ. शकुंतला गिजरे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या महिलांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

महिलांच्या कर्तृत्वाला समाजासमोर आणत त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!