Uncategorized
Trending

गेल्या 40 वर्षांची ऐतिहासिक कारकीर्द संपवून डॉ. प्रभाकर कोरे यांचा धक्कादायक निर्णय..

बेलगाम प्राईड/ प्रतिष्ठित कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी (KLE) ला गेली चार दशके नेतृत्व देत संस्थेला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देणारे डॉ. प्रभाकर कोरे यांनी अध्यक्षपदावरून अचानक माघार घेतल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गुरुवारी रात्री झालेल्या घडामोडींमध्ये डॉ. कोरे यांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले. 1985 पासून त्यांनी भूषवलेले हे प्रतिष्ठित पद त्यांनी स्वेच्छेने सोडल्याने केएलई संस्थेतील 12 संचालकांची निवड अविरोध झाली आहे.

नवीन संचालक मंडळात डॉ. कोरे यांची कन्या डॉ. प्रीती दोडवाड आणि पुत्र अमित कोरे यांचा समावेश असून  महंतेश कौजलगी अध्यक्ष, तर बसवराज तटवटी उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. याशिवाय अमित कोरे, प्रविण बागेवाडी, प्रीती दोडवाड, महंतेश  कवटगीमठ, मल्लिकार्जुन कोळी, विजय मेटगुड, जयआनंद मुनवळ्ळी, मंजुनाथ मुनवळ्ळी, बसवराज पाटील, विश्वनाथ पाटील, यल्लनगौडा पाटील आणि अनिल पाटील यांची संचालक म्हणून अविरोध निवड झाली आहे.

डॉ. प्रभाकर कोरे यांनी वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी केएलई संस्थेची धुरा हाती घेतली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली केवळ 36 संलग्न संस्थांपासून सुरू झालेली केएलई आज तब्बल 316 संस्थांपर्यंत विस्तारली असून, हा काळ संस्थेचा खऱ्या अर्थाने सुवर्णयुग मानला जातो.

गेल्या 40 वर्षांत देशातील जवळपास सर्व पंतप्रधान, राष्ट्रपती आणि कर्नाटकातील बहुतेक मुख्यमंत्री केएलई संस्थेला भेट देऊन गेले, हे देखील कोरे यांच्या नेतृत्वाचे मोठे यश मानले जाते. परदेशातही केएलईची ओळख निर्माण करून संस्थेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

कोरे यांच्या माघारीमागील कारणांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. ‘एकाच कुटुंबातील तिघांचे संचालक मंडळात असणे योग्य नाही’ या भूमिकेतून त्यांनी नामनिर्देशन मागे घेतल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे. तर युवा नेतृत्वाला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही सांगितले जात आहे.

8 फेब्रुवारी रोजी केएलई संस्थेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार असून, डॉ. कोरे भविष्यात मार्गदर्शकाच्या भूमिकेत संस्थेला दिशा देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केएलई संस्थेची स्थापना करणाऱ्या ‘सप्तऋषी’ परंपरेत स्वतःचे स्थान निर्माण करून ‘अष्टम ऋषी’ म्हणून ओळख मिळवलेले डॉ. प्रभाकर कोरे यांची ही ऐतिहासिक कारकीर्द केएलईच्या इतिहासात कधीही पुसली जाणार नाही, हे मात्र निश्चित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!