पंचहमी योजनेतून तालुक्याला आतापर्यंत पाचशे कोटीचा निधी
माजी आमदार अंजली निंबाळकर यांची माहिती

बेलगाम प्राईड/ काँग्रेसने कर्नाटकात सतेत येण्यापूर्वी पंचहमी योजना जाहीर केली होती. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक सरकारने पंचहमी योजना लागू केली. एक हजार दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसने विविध उपक्रम राबवून पंचहमी योजनेत प्रत्येक तालुक्यात किती निधीचा वापर केला गेला. हे जाहीर केले आहे. यात खानापूर तालुक्यात पंचहमी योजनेंतर्गत आतापर्यंत साधारणपणे ५०० कोटी रुपये जनतेपर्यंत पोहोचवले गेले, अशी माहिती माजी आमदार व एआयसीसी संचिव डॉ.अंजली निंबाळकर यांनी दिली.
काँग्रेसने सत्तेत येण्यापूर्वी राज्यातील गोरगरीब, सामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि महिलांच्या उन्नतीसाठी पंचहमी योजना जाहीर करुन सत्तेत आल्यास तातडीने योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. कर्नाटकात काँग्रेसची एक हाती सत्ता आल्यानंतर सिद्धरामय्या सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्यभर पंचहमी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. आतापर्यंतच्या सुमारे १००० दिवसांत पंचहमी योजनांसाठी राज्य सरकारने १.१६ लाख कोटी रुपये खर्च केले
डॉ. अंजली निंबाळकर ह्या म्हणाल्या ही देशातील सर्वात मोठ्या कल्याणकारी योजनांपैकी एक असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. या योजनांचा राज्यातील १.३७ कोटी कुटुंबांना थेट लाभ होत आहे. पंचहमी योजनांमुळे राज्याच्या दरडोई उत्पन्नातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
खानापूर तालुक्याला दरमहा २० कोटी रुपये
खानापूर तालुक्यात दरमहा सुमारे २० कोटी रुपये पंचहमी योजनांमधून येतात. पंचहमी योजना सुरू होऊन सुमारे २६ महिने झाले आहेत. दरमहा २० कोटी रुपयांच्या प्रमाणे आतापर्यंत साधारण ५०० कोटी रुपये काँग्रेस सरकारने तालुक्यास दिले आहेत. तसेच विकास कामावरही सरकारने भर दिलेला आहे. सरकारकडे विकासासाठी पैसे नाहीत, हा विरोधकांचा आरोप हा निखालास खोटा असून राज्यात
विकासाबरोबर दरिद्र्यरेषेखालील लोकांना पंचहमी योजनेतून मदत करून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे काँग्रेस सरकार
प्रत्येक सरकारची ध्येयधोरणे वेगळी असतात. काँग्रेसचे धोरण गोरगरीब, सामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि महिलांच्या सबलीकरणावर आधारित राहिले आहे. त्यामुळे या घटकांसाठी सरकार भरीव निधी देत आहे. काँग्रेस म्हणजे सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे आणि सामान्यांना मदत करणारे सरकार आहे. असे अंजली निंबाळकर यांनी सांगितले.




