
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला ३० वर्षांची शिक्षा
बेलगाम प्राईड /अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर गोवा राज्यात वारंवार लैंगिक अत्याचार ३० केल्याच्या आरोपावरून एका आरोपीला वर्षांचा सश्रम कारावास आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कृष्णा मल्लेशी गाडीवड्डर (वय २३) रा. प्लॅट नं. १४४, रामनगर वड्डरवाडी असे त्याचे नांव असून जिल्हा पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली आहे.
आरोपीने २९ जुलै २०२४ रोजी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिला गोवा राज्यात नेऊन एका खोलीत ठेवले. त्या ठिकाणी २९ जुलै ते ८ सप्टेंबर २०२४ पर्यंत तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगितलीस तर तुला जीवानीशी सोडणार नाही, अशी धमकी दिली. सदर बाब उघडकीस
आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक हुसेन, एल. केरुर यांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून घेतला. तत्कालीन तपास अधिकारी महांतेश के. धामण्णावर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केला. त्यामुळे याची सुनावण जिल्हा पोक्सो न्यायालयात सुरू होती.
सरकारी पक्षातर्फे ६० कागदोपत्री पुरावे, दोन मुद्देमाल व ८ साक्षी तपासण्यात आले. यावेळी आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी आरोपीला ३० वर्षांचा सश्रम कारावास व १ लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास दोन वर्षांची वाढीव शिक्षा तसेच पीडितेला जिल्हा कायदा प्राधिकारकडून ४ लाखांची भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने बजावला. सरकारी पक्षातर्फे ॲड.एल.व्ही.पाटील यांनी काम पाहिले.




