
बेलगाम प्राईड / दरवर्षीप्रमाणे स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगाव यांच्यातर्फे वेगळ्या पद्धतीने सक्षम (दिव्यांग) आणि वंचित मुलांसाठी दि.1 ते दि.24 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित 24 व्या भव्य मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराची केएलईच्या सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव, बेळगाव येथे यशस्वी सांगता झाली.
सदर शिबिराच्या सांगता समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, डॉ.नितीन खोत (दूरदर्शी व्यक्ती), रोहित देशपांडे, बसनगौडा पाटील (संचालक – जयभारत फाउंडेशन), निरंजन कल्लोळ, लता कित्तूर (अध्यक्षा, स्विमर्स क्लब), सुधीर कुसाणे आणि जगदीश गस्ती हे मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. पोहणे हा केवळ एक खेळ नाही तर एक उपचार आहे. जो विशेष मुलांचे शारीरिक आरोग्य, भावनिक लवचिकता आणि शैक्षणिक आत्मविश्वास बळकट करतो असे ते म्हणाले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या समायोचित भाषणांनंतर त्यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळच्या मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिरामध्ये बौद्धिक अपंगत्व, दृष्टीदोष, शारीरिक मर्यादा, श्रवणविषयक अडचणी, तसेच गरिबी, अनाथत्व आणि आदिवासी समुदायांची पार्श्वभूमी अशा विविध आव्हानांचा सामना करणारी 220 हून अधिक मुले सहभागी झाली होती. शिबिरातील त्यांचा हा सहभाग त्यांना केवळ पोहणे नव्हते, तर आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि ते देखील मोठे स्वप्न पाहू शकतात असा विश्वास देऊन गेला.
दरवर्षीप्रमाणे या शिबिरार्थीनसाठी आयोजकांनी मोफत वाहतूक, जलतरण किट आणि पौष्टिक दैनंदिन नाश्त्या यांची सोय केली होती. एकेकाळी पाण्याची भीती बाळगणारे अनेक सहभागी या शिबिरामुळे आता आत्मविश्वासाने पोहत आहेत. या उपक्रमाचा परिणाम तलावाच्या पलीकडेही पसरत असून गेल्या कांही वर्षांत या प्रशिक्षण शिबिराने 10 आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू तयार केले आहेत.
ज्यांनी 70 हून अधिक आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. राजेश शिंदे याने तर इंग्लिश खाडी (2008) यशस्वीरित्या पार केली आहे. याखेरीज विविध राष्ट्रीय पॅरा चॅम्पियनशिपचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शेकडो जलतरणपटूंनी हजारो पदके जिंकून बेळगाव, कर्नाटक आणि देशाचा नावलौकिक वाढवला आहे. शिबिराच्या या व्यासपीठावरून मातब्बर पॅरा जलतरणपटूंनी प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवले असून ज्यामध्ये 1 राष्ट्रपती पुरस्कार (भारत सरकार), 4 एकलव्य पुरस्कार विजेते, 2 कर्नाटक राज्य पुरस्कार विजेते, 1 जीवनगौरव पुरस्कार आणि सर्वात तरुण यशस्वी इंग्लिश खाडी जलतरणपटूसाठी प्रतिष्ठित ऑंड्र्यू स्कॉट पुरस्कार (2008) आणि इतर अनेक सन्मान समाविष्ट आहेत.
मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिरादरम्यान आशादायक चांगल्या शिबिरार्थींची वर्षभर व्यावसायिक प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. ज्यामुळे त्यांचा राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यशाच्या दिशेने प्रवास सुरू राहतो.
शिबिराच्या या उदात्त उपक्रमाला केएलई अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, जयभारत फाउंडेशन, एसएलके सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड, द अलाइड फाउंडर्स प्रायव्हेट लिमिटेड, एकेपी फेरोकास्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि कल्याणी स्वीट्स, बेळगाव यांचे उदार सहकार्य लाभले. उपक्रमाचे संचालक उमेश कलघटगी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली नितीश कुडुचकर, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर, आनंद पाटील, समीर नदाफ, विशेष कागलकर, विनोद दोडमणी, शिवाजी मानमोडे, संजीव हंचिनमाने, विनायक आंबेवाडीकर, प्रसाद वेर्णेकर, आशिष कुरणकर, चंद्रशेखर डी. एच. या समर्पित चमुची अढळ वचनबद्धता आणि असंख्य उत्साही स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे यंदाचे शिबिर यशस्वी झाले.
कोचिंग कॅम्प म्हणून सुरू झालेली ही चळवळ आता समावेशकता, लवचिकता आणि आशेच्या चळवळीत रूपांतरित झाली असून संधी मिळाल्यास प्रत्येक मूलं मर्यादा ओलांडून महानतेला स्पर्श करू शकते हे या शिबिराने सिद्ध केले आहे.




