
बेलगाम प्राईड / मतदारसंघातील जनतेच्या तक्रारींची दखल घेत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी भांदूर गल्ली परिसरातील रहिवाशांची अनेक वर्षांची समस्या मार्गी लावली आहे. महिलांच्या मागणीनुसार मूलभूत सुविधांचे काम पूर्ण केल्याबद्दल स्थानिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
बेळगाव उत्तर मतदारसंघातील भांदूर गल्ली, फूलबाग गल्ली आणि ताशिलदार गल्लीतील रहिवासी गेल्या अनेक काळापासून सांडपाण्याच्या समस्येने त्रस्त होते. साधारण दीड महिन्यांपूर्वी जेव्हा आसिफ सेठ या भागात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनासाठी आले होते तेव्हा स्थानिक महिलांनी रस्ता बनवण्यापूर्वी भूमिगत गटार (यूजीडी) वाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.
जनतेची अडचण ओळखून आमदारांनी त्याच वेळी रस्त्याचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. आधी सांडपाणी वाहिनीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार आता यूजीडीचे काम पूर्ण झाले असून, त्यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची जोडणीही करण्यात आली आहे. या कामांनंतर आता पुन्हा रस्ते डांबरीकरणाच्या कामाला वेग आला असून फूलबाग गल्ली येथे या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.




