
बेलगाम प्राईड/ पत्रकारिता क्षेत्रातील छायाचित्रण सेवेत गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या बेळगावच्या ज्येष्ठ वृत्तछायाचित्रकार पी. के. बडिगेर यांना कर्नाटक छाया रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार १२ जून रोजी सकाळी १० वाजता बेंगळुरू येथील अरमने मैदानातील त्रिपुर वासिनी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावरील फोटो टुडे प्रदर्शनात प्रदान करण्यात येणार आहे. आपल्या छायाचित्रांद्वारे सामान्य जनतेच्या समस्या, सामाजिक घडामोडी, राजकीय घडामोडी तसेच विविध क्षेत्रांतील महत्त्वाचे क्षण प्रभावीपणे टिपून जतन केल्याबद्दल पी. के. बडिगेर यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान दिला जात आहे.
बडगेर यांचा परिचय
बेळगावमध्ये सुरुवातीला दुकाने आणि कार्यालयांच्या नामफलकांचे लेखन करणारे पेंटर म्हणून काम करणाऱ्या बडिगेर यांनी ‘नाडोज’ या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून सेवा सुरू करून पत्रकारिता क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर संयुक्त कर्नाटक दैनिकाच्या माध्यमातून त्यांनी वृत्तछायाचित्रण क्षेत्रात पूर्णवेळ कार्य सुरू केले. पुढे जवळपास दोन दशकांच्या कालावधीत त्यांनी द हिंदू आणि उदयवाणी या वृत्तपत्रांतही सेवा बजावली.
त्यांची उत्कृष्ट छायाचित्रे कन्नड, इंग्रजी, हिंदी आणि मराठी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली आहेत. केवळ बातम्यांशी संबंधित छायाचित्रेच नव्हे, तर निसर्गातील अद्भुत दृश्ये, पर्यावरणाचे सौंदर्य, तसेच प्राणी-पक्ष्यांच्या दुर्मिळ हालचाली टिपून त्यांनी वन्यजीव छायाचित्रकार म्हणूनही ओळख निर्माण केली आहे.
अतिवृष्टी, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागांत जाऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी तेथील लोकांच्या वेदनादायक परिस्थितीची हृदयस्पर्शी छायाचित्रे टिपली आहेत. त्यामुळे शासन आणि समाजाचे लक्ष या समस्यांकडे वेधले गेले.
आतापर्यंत मिळालेले पुरस्कार
यापूर्वीही बडिगेर यांना धारवाड आर. के. छाया फाउंडेशन आणि सृष्टी संघटना यांच्यातर्फे प्रदान करण्यात येणारा ‘बिंब-भाव’ पुरस्कार, ‘बाबूराव ठाकूर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार’, तसेच २०२३ सालचा बेळगाव जिल्हा प्रशासनाचा कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार यांसह अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.




