Uncategorized
Trending

पुण्यातील खानापूर-बेळगाव मित्रमंडळाचा सीमालढ्याच्या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त पाठिंबा

June 9, 2026

बेलगाम प्राईड/ सीमाभागातील मराठी अस्मिता आणि प्रलंबित सीमाप्रश्नाबाबत जनजागृती करण्यासाठी सुरू असलेल्या स्वाक्षरी मोहिमेला पुणे येथील खानापूर-बेळगाव मित्रमंडळाने उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. मित्रमंडळाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व विद्यार्थी-पालक मार्गदर्शन मेळाव्यादरम्यान शेकडो सीमाभागीय नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून सीमालढ्याशी आपली बांधिलकी व्यक्त केली.

पुणे शहरात खानापूर, बेळगाव आणि सीमाभागातील अनेक कुटुंबे नोकरी, व्यवसाय आणि उद्योगाच्या निमित्ताने स्थायिक झाली असली, तरी त्यांची नाळ आजही मातृभूमीशी घट्ट जोडलेली असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. कार्यक्रमानंतर आयोजित छोटेखानी सभेत खानापूर मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय पाटील (हत्तरवाड) यांनी उपस्थितांना संबोधित करत सीमाप्रश्नाच्या न्याय्य लढ्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

“आम्ही महाराष्ट्रात स्थायिक झालो असलो आणि मराठी भाषिक म्हणून जीवन जगत असलो, तरी सीमाभागाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठी पत्रकार संघाने सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला महाराष्ट्र एकीकरण समितीसह विविध संघटनांचा पाठिंबा लाभला आहे. या मोहिमेत सहभागी होऊन आपण आपल्या मातृभूमीचे ऋण फेडले पाहिजे,” असे मत विजय पाटील यांनी व्यक्त केले.

खानापूर मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष पीटर डिसोजा (माचीगड) यांनीही या मोहिमेला जाहीर पाठिंबा देत सीमाभागात मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. “ज्ञानवर्धिनीच्या माध्यमातून मराठीचा प्रसार सुरू आहे. मात्र सीमाप्रश्नही तितक्याच तातडीने मार्गी लागणे गरजेचे असून त्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्वनाथ पाखरे (हेब्बाळ हट्टी), गणपती पाटील (हलगा), वैराळ सुळकर (माचीगड), सातेरी पाटील (नंदगड), अर्जुन वीर (मळवाड) आणि मारुती गावाडा (हत्तरवाड) यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी बीपीएल फाउंडेशनचे माजी अध्यक्ष दत्ता भेटणे (हेब्बाळ), विद्यमान अध्यक्ष संदीप घाडी (होनकल), ज्येष्ठ संचालक रामचंद्र निलजकर (गोदगेरी), श्रीधर पाटील (चन्नेवाडी) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने सीमाभागीय नागरिकांची उपस्थिती लाभली असून स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!