
बेळगावच्या दिनेश ओऊळकर यांच्यावर RBI ची मोठी जबाबदारी; उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
बेलगाम प्राईड/ भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी बेळगावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त तथा विशेष निबंधक दिनेश लक्ष्मणराव ओऊळकर यांची नियुक्ती केली आहे.
नागरी सहकारी बँकांसाठी ‘मॉडेल बाय-लॉज’ अर्थात आदर्श उपविधींचा मसुदा तयार करण्यासाठी RBI ने या पाच सदस्यीय समितीची स्थापना केली असून, समितीचे नेतृत्व दिनेश ओऊळकर करणार आहेत. RBI च्या मुख्य महाव्यवस्थापक सेंटा जॉय यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे.
सन २०२० मध्ये बँकिंग नियमन कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने नागरी सहकारी बँकांमध्ये अधिक पारदर्शक व प्रभावी प्रशासन, नियामक तरतुदींचे काटेकोर पालन तसेच भांडवल उभारणीची प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने या समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीला पहिल्या बैठकीपासून तीन महिन्यांच्या आत आपला अहवाल RBI कडे सादर करायचा आहे.
दिनेश ओऊळकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असताना प्रामाणिक, कार्यक्षम आणि अभ्यासू अधिकारी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासनाने स्थापन केलेल्या सीमा कक्षात त्यांनी विशेष कर्तव्य अधिकारी (Special Officer on Duty) म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. याशिवाय सीमा प्रश्नावरील शासनाच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे.
RBI सारख्या देशातील सर्वोच्च बँकिंग संस्थेने त्यांच्यावर सोपविलेल्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीमुळे बेळगावसह सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




