
बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एम.के. हुबळी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ येथे दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात होऊन या अपघातातील दोन्ही वाहने आगीत जळून खाक झाल्याची शुक्रवारी रात्री घडली.
कित्तूर मार्गे बेळगावकडे जात असलेल्या दूध टँकर आणि गायींसाठीच्या मक्याच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये हा अपघात झाला. दूध टँकरने भरधाव वेगात येऊन ट्रकच्या उजव्या बाजूला धडक दिल्याने हा अपघात घडला.
धडकेच्या तीव्रतेमुळे ट्रकला अचानक आग लागली आणि काही क्षणांतच आगीने संपूर्ण वाहनाला वेढले. आगीच्या भक्ष्यस्थानी ट्रकमधील ५०० हून अधिक मक्याची पोती सापडून पूर्णपणे जळून खाक झाली.घटनेच्या वेळी दोन्ही वाहनांचे चालक प्रसंगावधान राखून वेळेत वाहनाबाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही काळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले आणि पुढील मोठी दुर्घटना टळली. ही घटना किट्टूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.




