EPFO : केंद्र सरकारकडून EPFO च्या वेतनमर्यादेत 25 हजारांपर्यंत वाढ, पगार आणि पेन्शनवर नेमका काय परिणाम होणार?

EPFO: केंद्र सरकारनं ईपीएफओच्या कक्षेत कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी मूळ वेतनाची मर्यादा 15000 रुपयांवरुन वाढून 25 हजार केली आहे. यामुळं 51 लाख कर्मचारी ईपीएफओमध्ये येतील.
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं ईपीएफओच्या कक्षेत आणण्यासाठी वेतनमर्यादेत वाढ केली आहे. केंद्राच्या नव्या निर्णयानुसार ज्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन आणि महागाई भत्ता 25 हजार रुपयांपर्यंत असेल त्यांना ईपीएफओमध्ये नोंदणी अनिवार्य असेल. केंद्राच्या या निर्णयामुळं 51 लाखांहून अधिक कर्मचारी ईपीएफओच्या कक्षेत येतील. यामुळं त्यांना पीएफ बचत आणि पेन्शन सुरक्षा मिळेल. कर्मचारी आणि रोजगार मंत्रालयाकडून 17 सप्टेंबरपासून नवा निर्णय लागू करण्यात आला आहे.यापूर्वी 2004 ते 2014 दरम्यान मूळ वेतन 6500 रुपये होतं. तर, 2014 ते 2026 दरम्यान मूळ वेतनाची रक्कम 15000 रुपये होती.
केंद्र सरकारला नव्या निर्णयामुळं 11339 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागेल. अर्थसंकल्पात यासाठी ईपीएफओसाठी अंदाजित रक्कम 10250 कोटी रुपये आहे. येत्या पाच वर्षात अंदाजित खर्च 56696 कोटी असेल. 51 लाख कर्मचारी ईपीएफओच्या कक्षेत आल्यानं त्यांना प्रॉविडंट फंड आणि ईपीएस योजना आणि एडीएलआय या योजनेनुसार विमा संरक्षणाचा लाभ मिळेल.
नव्या निर्णयापूर्वी ज्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 15 हजारांपूर्वी होतं ते नवे कर्मचारी ईपीएफओच्या कक्षेत येत नव्हते. आता मूळ वेतनमर्यादा 15000 रुपयांवरुन वाढवून 25000 रुपये केल्यानं कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळेल.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मोठा फायदा ईपीएसनुसार मिळणाऱ्या पेन्शनमध्ये होऊ शकतो. स्टँडर्ड EPS फ्रेमवर्कनुसार पेन्शन योग्य वेतन मर्यादा 2014 पासून 15000 रुपये निश्चित केली होती. त्यानुसार नियोक्त्याचं योगदान 8.33 टक्क्यांनुसार 1250 रुपये होतं. आता मूळ वेतनाची मर्यादा 25000 रुपयांपर्यंत वाढल्यानं त्यानुसार 8.33 टक्क्यांनी हिशोब केल्यास पेन्शन योगदान देखील 2083 रुपये होईल. म्हणजेच पेन्शनमधील योगदानात 833 रुपयांची वाढ होईल. 25 हजारांचे 12 टक्के म्हणजेच कर्मचाऱ्याचं पीएफ मधील योगदान 3000 रुपये होईल. कंपनीकडून जमा केल्या जाणाऱ्या 3000 रुपयांपैकी 917 रुपये पीएफ खात्यात तर 2083 रुपये पेन्शनमध्ये जमा होतील.
EPFO कडून एम्प्लॉइज प्रॉविडेंट फंड (EPF), एम्प्लॉइज पेन्शन स्कीम (EPS) आणि एम्प्लॉइज डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) योजना चालवली जाते. EPFO च्या आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांची संख्या 7.98 कोटी इतकी आहे. हे कर्मचारी 7.68 लाख कंपन्यांमधील आहेत. EPS अंतर्गत 82 लाख पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळतो.
