Uncategorized
Trending

समस्त’ ॲपमधील कामाचा अतिरिक्त ताण थांबवा; आशा कार्यकर्त्यांना दरमहा १५ हजार रुपये मानधन द्या

बेलगाम प्राईड/ आशा कार्यकर्त्यांना दरमहा १५ हजार रुपये मानधन निश्चित करावे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देईपर्यंत ‘समस्त’ ॲपवर काम करण्यासाठी दबाव आणू नये, तसेच मानधन व प्रोत्साहनधन नियमितपणे अदा करावे, अशा विविध मागण्या कर्नाटक राज्य संयुक्त आशा कार्यकर्ते संघाच्या बेळगाव जिल्हा समितीने केल्या आहेत.

यासंदर्भात जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने आशा कार्यकर्त्यांसाठी ‘समस्त’ ॲपच्या माध्यमातून काम करणे अनिवार्य केले आहे. मात्र, ॲपचा वापर करताना जिल्ह्यातील बहुतांश आशा कार्यकर्त्यांना अनेक गंभीर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

मोबाईल अथवा टॅबलेटची सुविधा नाही777

डिजिटल पद्धतीने काम करणे अनिवार्य करण्यात आले असले तरी आशा कार्यकर्त्यांना विभागाकडून आवश्यक दर्जाचे अधिकृत मोबाईल किंवा टॅबलेट मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. यापूर्वी स्वतःचा मोबाईल वापरण्यासाठी दरमहा २८० रुपये भाडे दिले जात होते. मात्र, ही रक्कमही बंद करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. समस्त’ ॲपवर माहिती भरण्यासाठी स्वतंत्र प्रोत्साहनधन निश्चित करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

वैयक्तिक मोबाईलच्या वापरामुळे गोपनीयतेचा प्रश्न

अनेक आशा कार्यकर्त्यांकडे दर्जेदार स्मार्टफोन नसल्याने कुटुंबातील सदस्य वापरत असलेल्या वैयक्तिक मोबाईलमध्ये विभागाचे ॲप डाउनलोड करून दिवसभर काम करावे लागत आहे. त्यामुळे मोबाईलची मेमरी भरून जाणे, मोबाईलच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणे तसेच वैयक्तिक माहिती व गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

तांत्रिक प्रशिक्षणाची मागणी

अनेक आशा कार्यकर्त्यांना स्मार्टफोन आणि डिजिटल ॲपच्या वापराबाबत पुरेसे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे ॲपवर काम करताना अडचणी येत आहेत. विशेषतः मध्यमवयीन आशा कार्यकर्त्यांना स्मार्टफोन व डिजिटल ॲपच्या वापराची पुरेशी माहिती नसल्याने काम करणे कठीण जात आहे. इंग्रजी-कन्नड टायपिंग करता येत नसलेल्या कार्यकर्त्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अतिरिक्त कामाचा ताण वाढला

आशा कार्यकर्त्यांवर आधीच क्षेत्रीय कामाची जबाबदारी आहे. त्यात ‘समस्त’ ॲपवर अतिरिक्त माहिती व नोंदी भरण्याचे काम देण्यात आल्याने कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या अतिरिक्त कामाचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

ॲपमधील तांत्रिक त्रुटींमुळे कामाचे नुकसान

‘समस्त’ ॲपमध्ये यापूर्वी नोंदविलेली माहिती योग्य प्रकारे सेव्ह होत नसल्याच्या तक्रारीही आशा कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. नोंदविलेली माहिती योग्य प्रकारे दिसत नसल्याने केलेल्या कामाची नोंद उपलब्ध होत नाही आणि परिणामी त्या कामासाठी मिळणाऱ्या मानधन किंवा प्रोत्साहनधनापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

आशा कार्यकर्त्यांना आवश्यक मोबाईल साधने उपलब्ध करून देणे, तांत्रिक प्रशिक्षण देणे, ‘समस्त’ ॲपमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करणे, अतिरिक्त डिजिटल कामासाठी स्वतंत्र प्रोत्साहनधन निश्चित करणे आणि मानधन व प्रोत्साहनधन नियमितपणे देणे, या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी कर्नाटक राज्य संयुक्त आशा कार्यकर्ते संघाच्या जिल्हा समितीने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!