Uncategorized
Trending

केएलईचे नूतन चेअरमन अमित कोरे यांची निवड

केएलईचे नूतन चेअरमन अमित कोरे यांची निवड

बेलगाम प्राईड/ आंतरराष्ट्रीय कीर्तीची शैक्षणिक संस्था असलेल्या कर्नाटका लिंगायत एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाच्या नूतन कार्याध्यक्षपदी अमित कोरे यांची निवड करण्यात आली आहे. केएलईच्या मुख्य कार्यालयात झालेल्या नव्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत अमित कोरे यांना संस्थेचे नेतृत्व सोपविण्यात आले. डॉ. प्रभाकर कोरे यांनी सलग ४२ वर्षे चेअरमन म्हणून कार्य करत संस्थेचा जागतिक विस्तार साधला होता. आज त्याच पदाची जबाबदारी व्यवस्थापन मंडळाने अमित कोरे यांच्याकडे सोपवून त्यांना शुभेच्छा दिल्या.

सन १९१६ मध्ये स्थापन झालेली केएलई सोसायटी ही देशातील अग्रगण्य शैक्षणिक व आरोग्य सेवा संस्थांपैकी एक आहे. शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय व अभियांत्रिकी संस्था तसेच रुग्णालयांसह ३१७ हून अधिक घटक संस्थांचे संचालन करणारी ही संस्था शतकभर समाजाभिमुख कार्य करत आहे. अशा भव्य संस्थेच्या कार्याध्यक्षपदी ४६ वर्षीय युवा नेतृत्व अमित कोरे यांची निवड होणे विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.

अमित कोरे हे २०१० पासून केएलई सोसायटीच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. प्रशासकीय निर्णय, विस्तार योजना आणि संस्थेचा दीर्घकालीन दृष्टीकोन ठरविण्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शैक्षणिक क्षेत्रासोबतच औद्योगिक क्षेत्रातही अनुभव असलेले अमित कोरे साधेपणा आणि सौजन्य यासाठी ओळखले जातात.

अमित कोरे यांनी श्री चिदानंद बसप्रभू कोरे साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून सध्या ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे उपाध्यक्ष, शिवशक्ती साखर कारखान्याचे संचालक, हर्म्स डिस्टिलरी प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मरकुंबी येथील इनामदार शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्य करत आहेत.

डॉ. प्रभाकर कोरे यांची केएलई संस्थेच्या मानद कार्याध्यक्षपदी निवड

१९८४ पासून केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून ४२ वर्षे दीर्घ सेवा देत संस्थेला जागतिक स्तरावर नेणाऱ्या डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाचा संस्थेच्या प्रगतीसाठी लाभ घ्यावा या उद्देशाने ८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या केएलई सर्वसाधारण सभेत त्यांची मानद कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

केएलई संस्थेचे नूतन पदाधिकारी:

अध्यक्ष: महांतेश शिवानंद कौजलगी,

उपाध्यक्ष: बसवराज शिवलिंगप्पा तटवटी,

मानद कार्याध्यक्ष: डॉ.प्रभाकर बसवप्रभू कोरे,

कार्याध्यक्ष: अमित प्रभाकर कोरे

व्यवस्थापन मंडळाचे सदस्य: प्रवीण अशोक बागेवाडी, डॉ.प्रीती किरण दोडवाड, महांतेश मल्लिकार्जुन कवटगिमठ, मल्लिकार्जुन चनबसप्पा कोळी, विजय श्रीशैलप्पा मेटगुड, मंजुनाथ शंकरप्पा मुनवळी, बसवराज रुद्रगौड पाटील, डॉ.विश्वनाथ ईरनगौड पाटील, यल्लनगौड शिवमोग्गेप्पा पाटील, अनिल विजयबसप्पा पट्टेड, बैठकीस सर्व पदाधिकारी तसेच सचिव डॉ. बी. जी. देसाई, संयुक्त सचिव डॉ. एस. एस. जलालपुरे आणि डॉ. पी. आर. कडकोळ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!