Uncategorized
Trending

आंबेडकर जयंती मिरवणुकीला काही अटीसह डॉल्बीला परवानगी 

बेलगाम प्राईड/ बेळगावमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती शांततेत आणि उत्साहात साजरी करण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक पार पडली. 

या बैठकीत मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विविध दलि‍त संघटनांच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी बोलताना दलि‍त नेते मल्लेश चौगुले यांनी मिरवणुकीत आवाजाची मर्यादा पाळून डॉल्बी वापरण्याची परवानगी देण्याची मागणी केली. तसेच जयंती उत्सवासाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करावी, अशी विनंती उपस्थित सदस्यांनी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस आयुक्तांनी यंदा अटी व शर्तींच्या अधीन राहून डॉल्बीला संमती दिली आहे.

जयंती उत्सवादरम्यान मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांमुळे वादाचे प्रसंग उद्भवतात, अशा समाजकंटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन ‘अल्कोहोल ब्रेथ ॲनालायझर’चा वापर केला जाणार असल्याचे आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले. महापुरुषांच्या जयंतीला मद्यप्राशन करून येणे हा त्यांचा अपमान आहे. असे सांगत मिरवणूक संपेपर्यंत अशा व्यक्तींना पोलीस कोठडीत ठेवले जाईल, असा इशारा भूषण बोरसे यांनी दिला.

मिरवणुकीत कोणत्याही प्रकारची शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. देशासाठी महान योगदान देणाऱ्या बाबासाहेबांची जयंती शांतता आणि सौहार्दाने साजरी करून एक नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन भूषण बोरसे यांनी केले. या बैठकीला डीसीपी नारायण बरमनी यांच्यासह बेळगावमधील विविध दलि‍त संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!