
बेलगाम प्राईड/ मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग स्क्वॉडने 12 जून रोजी केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्या दोघा जणांना अटक केली आहे. या दोन्ही कारवायांमध्ये प्रत्येकी एक कार आणि शस्त्र जप्त करण्यात आले असून एकूण जप्त मालाची किंमत सुमारे 2 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पहिल्या प्रकरणात, अँटी स्टॅबिंग स्क्वॉडचे पथक गस्त घालत असताना सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाली करणाऱ्या सर्वेश अभिजित कंग्राळकर (वय 26) रा. मारुती नगर, बेळगाव याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या जवळील केए-20/RU-6685 क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता त्यामध्ये बेकायदेशीररीत्या ठेवलेला ड्रॅगन चाकू आढळून आला असून आरोपी हे शस्त्र गुन्हेगारी हेतूने बाळगत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय मणिकंठ पुजारी व त्यांच्या पथकाने आरोपीकडून ड्रॅगन चाकू आणि कार जप्त केली. जप्त मालाची किंमत सुमारे 1 लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 151/2026 दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

दुसऱ्या कारवाईत, अँटी स्टॅबिंग स्क्वॉडने प्रेम बालू चौगुले (वय 31) रा. शाहापूर, बेळगाव याला ताब्यात घेतले. असून त्याच्या जवळील केए-22/EN-9784 क्रमांकाच्या कारमध्ये बेकायदेशीररीत्या ठेवलेली जांबिया (कुकरी) आढळून आली. हे शस्त्र गुन्हेगारी हेतूसाठी बाळगण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणात मार्केट पोलीस ठाण्याच्या पीएसआय रुक्मिणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जांबिया (कुकरी) आणि कार जप्त केली. जप्त मालाची किंमत सुमारे 1 लाख रुपये असून आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 152/2026 दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या दोन्ही यशस्वी कारवाया करणाऱ्या अँटी स्टॅबिंग स्क्वॉडच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त तसेच डीसीपी यांनी कौतुक केले आहे.




