Uncategorized
Trending

कर्नाटकातील ४४.८४ लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता

व्ही. अंबू कुमार पत्ता बदल, मृत्यू व डुप्लिकेट नोंदींची पडताळणी

बेगळूर बेलगाम प्राईड/ घर बदलल्यानंतरही मतदार यादीतील पत्ता अद्ययावत न केलेल्या सुमारे ४४.८४ लाख मतदारांची नोंद एएसडीडीओ (अनुपस्थित, स्थलांतरित, मृत, दोन ठिकाणी नोंद आणि इतर) या वर्गात करण्यात आली असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) व्ही. अनबू कुमार यांनी दिली. मतदार तसेच सर्व राजकीय पक्षांनी मतदार यादीची पडताळणी करून कोणतीही त्रुटी आढळल्यास तत्काळ कळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

पत्रकार परिषदेत बोलताना अनबू कुमार यांनी सांगितले की, एएसडीडीओ वर्गात ५,८७,४५७ अनुपस्थित मतदार, २६,३२,२२९ कायमस्वरूपी स्थलांतरित, ९,८१,६४२ मृत मतदार, २,७०,६५९ इतर ठिकाणी नोंदणी झालेले (डुप्लिकेट) आणि १२,३४४ इतर प्रकरणे (मुख्यतः स्वाक्षरी करण्यास नकार देणारे) यांचा समावेश आहे. अशा मतदारांची एकूण संख्या ४४,८४,३३१ इतकी आहे.

ही एएसडीडीओ यादी राज्यभरातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट्स (बीएलए) यांच्यासोबत शेअर करण्यात आली असून, मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ), जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ) आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फतही संबंधित माहिती सर्व पक्षांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ग्रेटर बंगळुर प्राधिकरण (जीबीए) क्षेत्रातच २३,८६,१३२ मतदार एएसडीडीओ वर्गात ओळखण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

गणना नमुना वितरण जवळपास पूर्ण

राज्यातील २४ जिल्ह्यांत गणना नमुन्यांचे १०० टक्के वितरण पूर्ण झाले आहे. संपूर्ण राज्यात केवळ ६० हजार नमुने वितरित करणे बाकी असून, तेही एक-दोन दिवसांत संबंधित मतदारांपर्यंत पोहोचतील, असे अनबू कुमार यांनी स्पष्ट केले.

डिजिटायझेशनमध्ये ६६. ३५ टक्के प्रगती

मतदार गणना प्रक्रियेचे आतापर्यंत ६६.३५ टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. हावेरी, चिक्कबळ्ळापूर, उत्तर कन्नड आणि हासन जिल्ह्यांनी ८० टक्क्यांहून अधिक प्रगती केली असून, बंगळुरमध्ये ही प्रगती सुमारे ३० टक्के आहे.

गेल्या २३ दिवसांत ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत व्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने पार पडत असल्याचा दावा त्यांनी केला.

५.५ कोटींहून अधिक नमुने वितरित

राज्यात आतापर्यंत ५.५ कोटींहून अधिक गणना नमुने वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी ३.५ कोटींहून अधिक भरलेले नमुने मतदारांकडून संकलित करून त्यांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. अजून सुमारे १.५ कोटी नमुन्यांचे डिजिटायझेशन बाकी असून, त्यासाठी १७ दिवसांचा कालावधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

८ ऑगस्टपूर्वी नमुने सादर करण्याचे आवाहन

८ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी सर्व मतदारांनी आपले गणना नमुने सादर करावेत, असे आवाहन अनबू कुमार यांनी केले. संबंधित मतदार घरी उपलब्ध नसल्यास, कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य त्या मतदाराच्या वतीने गणना नमुन्यावर स्वाक्षरी करू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!