
बेलगाम प्राईड/ बेळगावच्या सुवर्णसौधमध्ये पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन भरविण्यात येणार आहे. बेळगावला पावसाळी अधिवेशन भरवून मुख्यमंत्री सिद्धरामय्या उत्तर कर्नाटकाला विशेष प्राधान्य देत नवा इतिहास घडविण्याच्या तयारीत आहेत.
उत्तर कर्नाटकातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राज्याची दुसरी राजधानी असणाऱ्या बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन भरते. मात्र हे हिवाळी अधिवेशन दरवेळी केवळ औपचारिकता ठरत असल्याची टीका होत होती. मात्र आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या उत्तर कर्नाटकाला विशेष प्राधान्य देत बेळगावात पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन भरविणार आहेत.
कर्नाटक विधानमंडळाच्या इतिहासात प्रथमच पावसाळी अधिवेशन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुवर्ण विधान सौध येथे घेण्याच्या निर्णयावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींसोबत याबाबत चर्चा केली असून सर्व काही नियोजनानुसार झाले तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून दहा दिवसांचे पावसाळी अधिवेशन बेळगावात होणार आहे.
गेल्या 13 वर्षांपासून बेळगाव येथे दरवर्षी डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन भरवले जात आहे. डिसेंबरमधील हे अधिवेशन वर्षाअखेरीची परंपरा बनले होते. वर्षातून एकदाच बेळगावात अधिवेशन घेण्याची प्रथा होती. मात्र यंदा दोन्ही सभागृहांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे पावसाळी अधिवेशन बेळगावात घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतला आहे.
यातून उत्तर कर्नाटकाला केवळ प्रतीकात्मक नव्हे तर प्रत्यक्ष प्राधान्य दिले जात असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न सिद्धरामय्या सरकारकडून केला जात आहे.




