हॉकीपटूनी बेळगावचे नाव उंचावले: डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी 8 खेळाडूंची निवड
डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल निवडीसाठी यावर्षी खेळाडूंची संख्या दुप्पट

बेलगाम प्राईड/ बेळगांव हॉकी संघटनेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे संघटनेच्या तब्बल आठ युवा हॉकीपटूंनी कर्नाटक सरकारच्या युवा सक्षमीकरण व क्रीडा विभागाच्या (डीवायईएस) स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये स्थान मिळवले आहे. मागील वर्षी चार खेळाडूंची निवड झाली होती, तर यंदा हा आकडा दुप्पट होत आठवर पोहोचला आहे.
डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सानिका पाटील, सायली पाटील, सावनी गोडबोले, विजयालक्ष्मी पोरेवाडी, आचल नार्वेकर, प्रीती नंदुडकर, श्रेया पाटील आणि पवन यांचा समावेश आहे.
यापैकी सायली पाटील, सावनी गोडबोले आणि विजयालक्ष्मी पोरेवाडी यांची गदग येथील स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी निवड झाली तर सानिका पाटील, आचल नार्वेकर, प्रीती नंदुडकर, श्रेया पाटील आणि पवन यांना म्हैसूर येथील डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला आहे.
शालेय स्तरावरील मुला-मुलींमधील हॉकी प्रतिभा शोधून त्यांना दर्जेदार प्रशिक्षण देत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्याचे काम बेळगाव हॉकी संघटना सातत्याने प्रयत्न करत आहे. संघटनेच्या या प्रयत्नांचे फलित म्हणून दरवर्षी डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी निवड होणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
या यशामागे हॉकी बेळगावचे मानद सचिव व प्रशिक्षक निवृत्त सुभेदार सुधाकर चाळके, निवृत्त ऑनररी कॅप्टन उत्तम शिंदे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे परिश्रम आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत असून हॉकी बेळगावच्या कार्याचेही कौतुक केले जात आहे.




