
बेलगाम प्राईड/ दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असून शहरासमोर पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंगळवारी पाहणी करून उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला.
शहराला प्रामुख्याने राकसकोप जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा वापर वाढत असल्याने भविष्यातील गरजा लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जलाशयातील सध्याचा पाणीसाठा, मे अखेरपर्यंतची पाण्याची गरज तसेच हिडकल जलाशयातून होणाऱ्या पूरक पाणीपुरवठ्याची सविस्तर माहिती घेतली.
योग्य नियोजन केल्यास सध्याचा पाणीसाठा काही काळ पुरेसा ठरू शकतो. मात्र, पाण्याची नासाडी टाळणे आणि काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. शहरातील नागरिकांनीही पाणी बचतीसाठी सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी व्यक्त केले.




