Uncategorized
Trending

मराठी भाषेसाठी २२ जूनला मोर्चा; समितीचे पोलिस आयुक्तांना निवेदन

Belgaum Pride -June 11, 20260

बेलगाम प्राईड/ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर २२ जून रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चा संदर्भात चर्चा केली. यावेळी समितीने मोर्चा तसेच त्याआधी आयोजित करण्यात येणाऱ्या जनजागृती फेरीसाठी परवानगी देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात माजी महापौर मालोजी अष्टेकर, वकील अमर येळ्ळूरकर आणि विकास कलघटगी यांचा समावेश होता.

समितीने पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात कर्नाटक भाषा सर्वांगीण विकास अधिनियम २०२२ लागू झाल्यानंतर मराठी भाषेचा शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांचे फलक आणि अधिकृत कागदपत्रांमधील वापर कमी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच मराठी भाषेतील खासगी व्यावसायिकांचे फलक हटविण्यात आल्याने मराठी भाषिक समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, मराठी भाषिकांना भाषिक अल्पसंख्याक म्हणून भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार बाधित आहेत असे असून ही बेळगाव शहरासह सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर समितीने २२ जून रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांततापूर्ण मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा मोर्चा कॉलेज रोड मार्गे उपआयुक्त कार्यालयावर जाणार आहे.

तसेच या मोर्चाच्या जनजागृतीसाठी १५ ते १९ जून या कालावधीत शहरातील विविध भागांत सायंकाळी ६ ते ९ या वेळेत जनजागृती फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. शिवाजीनगर, खडेबाजार, शहापूर, टिळक चौक, स्टेशन रोड, गणेशपेठ, नाथ पै सर्कल यासह अनेक भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

समितीने या सर्व कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली असून मराठी भाषेच्या प्रश्नावर सीमाभागात पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!