कणकुंबी परिसर गेली वीस दिवस अंधारात. विजेचा लपंडाव सुरूच,नागरिक हैराण
गेल्या दोन महिन्यांपासून रात्रभर वीज गायब : हेस्कॉमचे अक्षम्य दुर्लक्ष

बेलगाम प्राईड कणकुंबी/ गेल्या दिड दोन महिन्यांपासून कणकुंबी आणि आसपासच्या परिसरातील गांवे महिनाभरापैकी जवळपास वीस दिवस अंधारात असून सतत खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या जून महिन्यात तर सलग आठ आठ दिवस वीज गायब होते.एक दिवस वीज आली तर आठ दिवस गायब असते.वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने कणकुंबी भागातील नागरिक हैरान झाले आहेत आंदोलनाच्या पवित्र्यात ही आहेत.
जर लाईट आलीच तर दिवसां फक्त एक दोन तासच राहते.तसेच दररोज रात्रभर वीजपुरवठा बंद रहात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने कणकुंबीसह काही गावांचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत

आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रास होत असून अभ्यासावर परिणाम होत आहे. परिणामी दैनंदिन जीवनमान कोलमडले आहे. त्यामुळे कणकुंबी परिसरातील नागरिकांतून हेस्कॉमच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हेस्कॉमने वीजपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा कणकुंबी परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
कणकुंबी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा होत असतो कधी कधी आठ दिवस वीजेचा पत्ताच नसतो. गेल्या महिनाभरात तर या परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून कणकुंबी भागातील गावे गेल्या चार पाच दिवसांपासून अंधारातच आहेत. याबाबत हेस्कॉम अधिकाऱ्यांना माहिती देवूनही वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे हेस्कॉम अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांतून हेस्कॉमच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
विजेअभावी नागरिकांना मोठ्या प्रमाणात अंधाराचा सामना करावा लागत आहे. तसेच पुरेशा विजेअभावी विजेवर चालणाऱ्या व्यवसाय, मोबाईल फोन,वीजेवरील घरगुती यंत्रे धूळ खात पडून आहेत. तसेच लहान मोठ्या उद्योग धंद्यावर देखील विपरीत परिणाम होत असून, दैनंदिन व्यवहार कोलमडल्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अनियमित वीजपुरवठ्यामुळे नळपाणी योजना कोलमडल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिला वर्गातूनही नाराजी व्यक्त होत आहे.
येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
खानापूर हेस्कॉमच्या दुर्लक्षपणामुळे कणकुंबी भाग गेल्या काही वर्षापासून फक्त पावसाळ्यातच नव्हे तर उन्हाळ्यात देखील आठ-आठ दिवस अंधारात असतो. दिवसा कधीतरी तास- दोन तास लाईट असते, अन्यथा नेहमी लाईट गायबच असते.त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यासाठी विचार करण्यात आला आहे. त्या दृष्टीने कणकुंबी आणि परिसरातील काही नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी एक बैठक देखील घेतली आहे.तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधी याची दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा असा इशारा कणकुंबी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष मंगेश नाईक, विठ्ठल गवस व इतर युवा वर्गाने दिला आहे.




