प्राण्यांप्रती करुणा आणि नागरिकांची सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी : महापौर प्रीती कामकर

बेलगाम प्राईड/ प्राण्यांप्रती करुणा दाखवणे हे आपल्या मानवतेचे प्रतीक असून, नागरिकांची सुरक्षा जपणे हीदेखील आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन बेळगावच्या महापौर प्रीती कामकर यांनी केले.
बेळगाव महानगरपालिका, जिल्हा प्राणी दया संघटना आणि पशुपालन व पशुवैद्यकीय सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी महानगरपालिका कार्यालयात ‘भटक्या कुत्र्यांच्या खाद्य क्षेत्रांसाठी प्रमाणित कार्यपद्धती’ (एसओपी) या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन करून महापौर प्रीती कामकर बोलत होत्या.
शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे योग्य पद्धतीने संरक्षण करण्यासोबतच नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. या दृष्टीने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा दिशादर्शक ठरेल, असे त्यांनी सांगितले.
उपमहापौर हनुमंत कोंगाली म्हणाले की, भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांच्यासाठी खाद्य क्षेत्र निश्चित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांना नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राणीप्रेमी आणि नागरिकांच्या सूचना व सल्ल्यानुसार भटक्या कुत्र्यांना खाद्य देण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी योग्य जागा निश्चित करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष राजू भातकांडे, विकास स्थायी समितीचे अध्यक्ष श्रेयस नाकाडी, नगरसेवक रवी धोत्रे, गिरीश धोंगडी, संदीप जीरग्याळ आणि शंकर पाटील उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता हनुमंत कलादगी यांनी स्वागत केले, तर पशुपालन व पशुवैद्यकीय सेवा विभागाचे डॉ. श्रीकांत गावी यांनी प्रास्ताविक केले.
कार्यशाळेतील तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ‘ह्यूमन वर्ल्ड फॉर ॲनिमल्स’ या संस्थेचे प्रतिनिधी भजंत्री आणि सीमंतिनी यांनी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. भटक्या कुत्र्यांसाठी खाद्य क्षेत्र निश्चित करणे, त्यांच्या संरक्षणासाठी योग्य पद्धतींचा अवलंब करणे आणि नागरिकांची सुरक्षितता जपणे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातील अभियंते अशोककुमार सज्जन, प्रवीणकुमार, आदिल खान, पेटा तसेच इतर संघटनांचे पदाधिकारी, प्राणीप्रेमी, नागरिक आणि महानगरपालिका व विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी या कार्यशाळेला उपस्थित होते. बसवराज कुप्पसगौड्र यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.




