खासदार प्रियांका जारकीहोळी यांचा साखरपुडा; गौतम पाटील यांच्याशी विवाह निश्चित

बेलगाम प्राईड/ कर्नाटकातील युवा खासदार प्रियांका जारकीहोळी यांचा साखरपुडा समारंभ बेळगाव येथे पारंपरिक पद्धतीने आणि साधेपणाने पार पडला. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कन्या असलेल्या प्रियांका यांचा विवाह रायचूर जिल्ह्यातील देवदुर्ग येथील गौतम पाटील यांच्याशी निश्चित झाला आहे.
बेळगावमधील क्लब रोड येथील मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हिल गार्डन निवासस्थानी हा साखरपुडा समारंभ आयोजित करण्यात आला होता. कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत पारंपरिक रीतीरिवाजांनुसार अंगठ्यांची देवाणघेवाण करून साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रियांका जारकीहोळी यांचे होणारे पती गौतम पाटील हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ते रायचूर जिल्ह्यातील देवदुर्ग येथील रहिवासी असून, त्यांचे वडील निवृत्त आरटीओ अधिकारी आहेत.
कौटुंबिक वातावरणात पार पडलेल्या या समारंभाची माहिती समोर आल्यानंतर प्रियांका जारकीहोळी यांच्या विवाहाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विवाहाची तारीख आणि अन्य तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.




