
बेलगाम प्राईड/बेळगावमधील जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनला कृषी पणन विभागाकडून मोठा झटका बसला आहे. परवान्याच्या अटींचे उल्लंघन आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यात अपयश आल्यामुळे एपीएमसीच्या निर्देशकांनी या खासगी भाजी मार्केटचे ट्रेडिंग लायसन्स रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
याआधीच बुडाने भूखंडाच्या वापराबाबतचा आदेश रद्द झाल्याने खासगी भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर व्यापाऱ्यांनी बेळगाव महानगरपालिकेकडे धाव घेऊन घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र आता एपीएमसीच्या या आदेशामुळे व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे.
जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनला खासगी बाजारपेठ उभारून ती चालवण्यासाठी दिलेल्या परवान्याचे नियम पाळले जात नाहीत, अशा अनेक तक्रारी शेतकरी संघटनांनी सातत्याने नोंदवल्या होत्या. त्यानुसार कृषी पणन विभागाने ही कडक कारवाई केली आहे.



