किनारपट्टी भागातील पर्यटन विकासासाठी संपूर्ण सहकार्य : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
किनारपट्टी कर्नाटक पर्यटन परिषदेतील मंत्र्यांची हमी

बेलगाम प्राईड मंगळूरू/ बाहेरील राज्यांमध्ये तसेच परदेशात उद्योग स्थापन केलेले किनारपट्टी भागातील उद्योजक आता आपल्या मातृभूमीकडे वळत असून, त्यांना राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी हमी महिला व बालविकास मंत्री तसेच उडुपी जिल्ह्याच्या पालकमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
मंगळूरू येथील एका खासगी हॉटेलमध्ये पर्यटन विभाग व दक्षिण कन्नड, उडुपी आणि उत्तर कन्नड जिल्हा प्रशासनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किनारपट्टी कर्नाटक पर्यटन परिषदेत त्या बोलत होत्या. येत्या काळात किनारपट्टी जिल्हे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतील, असे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच किनारपट्टी विकासासाठी कटिबद्ध असलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करू इच्छिते. पुढे इतिहास घडवण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
सरकारच्या एका आवाहनावर तीनही जिल्ह्यांतील उद्योजक एकत्र आले आहेत. यावरून उद्योजकांचे आपल्या जन्मभूमीवरील प्रेम दिसून येते. बेलगाव कुठे आणि उडुपी कुठे, तरीही मी उडुपी जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून येथे आले. आज उडुपी जिल्ह्याबद्दल माझ्या मनात विशेष आपुलकी निर्माण झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
पर्यटन व शिक्षणाच्या दृष्टीने उत्तर कर्नाटकातील बहुतेक लोक किनारपट्टी भागाकडे येतात. पर्यटनाला अडथळा ठरणाऱ्या सीआरझेड (CRZ) मंजुरीबाबत आमचे सरकार निर्णय घेईल. या तीन जिल्ह्यांचा विकास करूया आणि कर्नाटक राज्याला सर्वाधिक आर्थिक ताकद मिळवून देऊया, असे आवाहन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर, पर्यटन मंत्री एच. के. पाटील, दक्षिण कन्नड जिल्ह्याचे पालकमंत्री दिनेश गुंडूराव, उत्तर कन्नड जिल्ह्याचे पालकमंत्री मंकाळ वैद्य, आमदार सतीश साईल, गुर्मे सुरेश शेट्टी, राजेगौडा, भीमा नायक, विधान परिषदेचे सदस्य आयव्हान डिसोजा, मुख्यमंत्री यांचे राजकीय सचिव नासीर अहमद, किनारपट्टी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. ए. गफूर, महामंडळांचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.




