मायक्रो फायनान्सचा त्रास कंटाळून महिलेची आत्महत्या मृत्यूपूर्वी भिंतीवर लिहिली चिठ्ठी

बेलगाम प्राईड/ शासनाने मायक्रो फायनान्स संस्थांवर विविध निर्बंध घातले असतानाही कर्जवसुलीचा छळ सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मायक्रो फायनान्सच्या कर्जवसुलीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या करून भिंतीवर चिठ्ठी लिहून ठेवल्याची धक्कादायक घटना बैलहोंगल येथे घडली.
गौरव्वा नीलप्पा केंगानूर (वय 36) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गौरव्वा यांनी विविध मायक्रो फायनान्स संस्थांकडून सुमारे ७ ते १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जफेडीसाठी संबंधित संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने मानसिक छळ व दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या त्रासाला कंटाळून गौरव्वा या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी त्यांनी घराच्या भिंतीवर मृत्यूपत्र लिहून ठेवले असून, त्यात आपल्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मायक्रो फायनान्स संस्थांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.




