
बेलगाम प्राईड/ टिळकवाडी, बेळगाव येथील आरपीडी कला आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित 6 व्या मि. आरपीडी टॉप -5 बेस्ट फिजिक कॉम्पिटिशन या शरीरसौष्ठव स्पर्धेतील ‘मि. आरपीडी’ हा किताब संकेत सुरूतेका याने पटकावला. त्याचप्रमाणे ‘बेस्ट पोझर’ अनंत कामू हा ठरला.
आरपीडी महाविद्यालयाच्या शरीरसौष्ठवपटू असलेल्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असणारी उपरोक्त स्पर्धा गेल्या मंगळवारी के. एम. गिरी सभागृहात यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आरपीडी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आयुष फिटनेसचे मालक अश्विनकुमार निंगन्नावर, बेळगाव जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच जयदीप सिद्धनावर आणि आरसीयू बेळगावचे क्रीडा संचालक डॉ. जगदीश गस्ती उपस्थित होते. तसेच सन्माननीय अतिथी म्हणून एसकेई सोसायटी स्पोर्ट्स अकादमीचे सदस्य प्रसाद तेंडुलकर, आरसीयुबी बेस्ट फिजिक स्पर्धेचे अध्यक्ष व आरपीडी कॉलेजचे प्राचार्य डाॅ. अभय एम. पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रसन्ना जोशी व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रामकृष्ण एन. हजर होते. स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आरपीडी महाविद्यालयांचे प्राध्यापक, बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि विद्यार्थी बहुसंख्येने हजर होते.




