Uncategorized
Trending

नागनहट्टी गावातील रेणुकादेवी भक्तांचा ग्रामीण पोलीस स्थानकावर मोर्चा

बेलगाम प्राईड / सौंदत्ती येथील श्री यल्लमा यात्रेसाठी ग्रामपंचायतीचा पाण्याचा टँकर नेण्याच्या प्रकरणावरून नागेनहट्टी (ता. जि. बेळगाव) येथील रेणुका भक्तांनी आज शनिवारी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. पोलीस अधिकाऱ्यांकडून टँकर तात्काळ परत आणण्याबाबत कथित धमकी दिल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी हा मोर्चा काढला होता. काही काळ पोलीस ठाण्यासमोरील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

बेळगाव ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर दाखल होऊन देवीच्या नावाचा जयघोष केला आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी गावातील पंचायत सदस्य आणि प्रमुख मंडळींनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून कोणावरही कारवाई केली जाणार नाही. असे स्पष्ट केल्यानंतर आंदोलन शांत झाले आणि ग्रामस्थांनी मोर्चा मागे घेतला.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना धनंजय जाधव यांनी सांगितले की, नागेनहट्टी गावातील ग्रामस्थ दरवर्षी सौंदत्ती येथील यल्लमा यात्रेला जातात. यात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याने यंदा ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टँकरचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी पंचायत विकास अधिकाऱ्यांची (पीडीओ) परवानगीही घेण्यात आली होती.

मात्र, टँकर रातोरात परत ग्रामपंचायतीकडे नेण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा टँकर घेऊन यात्रेला रवाना झाले. याच दरम्यान पीडीओंनी टँकर विनापरवानगी नेल्याची तक्रार पोलिसांकडे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तसेच, यात्रेसाठी गेलेल्या काही भाविकांना पोलीस अधिकाऱ्यांनी फोन करून टँकर तात्काळ परत आणण्याचा इशारा दिला, अन्यथा कारवाई करण्याची धमकी दिल्याचेही जाधव यांनी सांगितले.

“संपूर्ण गावासाठी वापरल्या जाणाऱ्या टँकरसंदर्भात गावकऱ्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो अन्याय आहे. अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे,” असे जाधव यांनी ठामपणे नमूद केले. तसेच संबंधित पीडीओंवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.

पोलीस प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतर परिस्थिती निवळली असली तरी या घटनेमुळे बेळगाव ग्रामीण भागातील प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!