
बेलगाम प्राईड/ सीमाभागातील दिवसेंदिवस वाढत असलेली कन्नडसक्ती रोखण्यासाठी व मराठी भाषिकांचे भाषिक अल्पसंख्यांक हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दिनांक 22 जून रोजी होणाऱ्या मोर्चा संदर्भात कार्यकर्त्यांचे विचार व या मोर्चाचे नियोजन व प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक रविवार दिनांक १४ रोजी दुपारी ठिक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रीज) येथे आयोजित करण्यात आली आहे.
सीमाभागात सार्वजनिक ठिकाणी असलेले फलक तसेच प्रत्येक दुकानावरील व व्यावसायिक ठिकाणी असलेले फलकावर आज कन्नडसक्ती वाढत चालली आहे. या कन्नडसत्तीमुळे येथील मराठी भाषिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांना भाषिक अल्पसंख्याक अधिकार द्यावे असे वारंवार केंद्र सरकारच्या भाषिक अल्पसंख्याक आयोगाने कर्नाटक सरकारला केले आहेत. परंतु या सूचनेची दखल अद्याप कर्नाटक सरकारने घेतली नाही आहे.तसेच येथे पुन्हा कन्नड सक्ती जोमाने वाढतच आहे.
या भाषिक अन्यायाविरोधात सोमवार दिनांक 22 जून रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढून या कन्नड सक्ती बद्दल कर्नाटक सरकारचे लक्ष वेधून मराठी भाषिकांना त्यांचे भाषिक अल्पसंख्यांक हक्क देण्यासाठी सरकारला भाग पाडावे लागणार आहेत. या मोर्चा संदर्भात कार्यकर्त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी व या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी हि बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, युवा व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी,मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस अँड एम जी पाटील, कार्याध्यक्ष आर एम चौगुले उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर,लक्ष्मण होणगेकर, विठ्ठल पाटील,मोनापा पाटील यांनी केले आहे.




