Uncategorized
Trending

लेफ्टनंट जनरल विजय ओबेरॉय, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम (निवृत्त)

बेलगाम प्राईड/ २९ सप्टेंबर १९४१ – १४ जून २०२६ भारतीय सैन्याचे माजी उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल विजय ओबेरॉय यांचे आज, १४ जून २०२६ रोजी, चंदीगड येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजारानंतर त्यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

जून १९६१ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये नियुक्त झालेल्या जनरल ओबेरॉय यांनी रेजिमेंटचे ब्रीदवाक्य “कर्तव्य, सन्मान आणि शौर्य” आयुष्यभर आचरणात आणले. १९६५ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीत सेवा बजावत असताना ते गंभीररीत्या जखमी झाले आणि त्यांना आपला उजवा पाय गमवावा लागला. मात्र या अपंगत्वाला कधीही आपल्या कर्तव्याच्या आड येऊ न देता त्यांनी पुढील ४० वर्षांहून अधिक काळ देशसेवा अत्यंत गौरवाने केली. पुढे त्यांना आपल्या अत्यंत प्रिय असलेल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचे कर्नल म्हणून नियुक्त होण्याचा दुर्मिळ सन्मानही लाभला आणि त्यांनी रेजिमेंटला नवी उंची गाठण्यास मार्गदर्शन केले.

त्यांनी संचालक जनरल मिलिटरी ऑपरेशन्स, आर्मी ट्रेनिंग कमांड (ARTRAC) चे आर्मी कमांडर आणि वेस्टर्न कमांडचे आर्मी कमांडर यांसारखी महत्त्वाची पदे भूषविली. ३० सप्टेंबर २००१ रोजी ते उपसेनाप्रमुख पदावरून निवृत्त झाले. अमेरिकेच्या आर्मी वॉर कॉलेजचे पदवीधर आणि मलेशियामधील लष्करी सल्लागार म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. राष्ट्रीय सुरक्षा आणि सैनिक कल्याणासाठीची त्यांची निष्ठा सर्वत्र आदराने स्मरणात राहील.

निवृत्तीनंतरही त्यांनी समाजसेवेचा ध्यास कायम ठेवला. वॉर वुंडेड फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष आणि सेंटर फॉर लँड वॉरफेअर स्टडीज (CLAWS) चे संस्थापक-संचालक म्हणून त्यांनी युद्धात अपंग झालेल्या सैनिकांच्या सन्मानासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी अथक प्रयत्न केले. “युद्धात अपंग झालेल्या सैनिकांना हुतात्म्यांप्रमाणेच सन्मान मिळाला पाहिजे,” असे ते नेहमी म्हणत. वयाच्या ७२व्या वर्षी कृत्रिम पायाच्या साहाय्याने त्यांनी मुंबई मॅरेथॉन पूर्ण करून जिद्द आणि इच्छाशक्तीला वयाची मर्यादा नसते हे सिद्ध केले.

ते एक विपुल लेखन करणारे सैनिक-विचारवंत होते. लष्करी विषयांवरील असंख्य लेख, निबंध आणि पुस्तके हे त्यांच्या कार्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मात्र त्यांच्या पदांपेक्षा आणि साहित्यिक योगदानापेक्षा त्यांचे धैर्य, नम्रता आणि सैनिक तसेच मराठा लाइट इन्फंट्रीप्रती असलेली अढळ बांधिलकी यासाठी ते सदैव स्मरणात राहतील.

त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती दौलत ओबेरॉय, ज्यांनी त्यांच्या अपंगत्वाच्या काळापासून खंबीर साथ दिली आणि अनेक मराठा तसेच इतर सैनिक कुटुंबांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरल्या, त्यांच्या कन्या, त्यांची प्रिय रेजिमेंट आणि कृतज्ञ राष्ट्र असा परिवार आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!