
बेळगाव कॅन्टोनमेंट बोर्डाला बॅडमिंटन स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद
बेलगाम प्राईड/ संरक्षण मालमत्ता महासंचालनालय (Directorate General, Defence Estates) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत बेळगाव कॅन्टोनमेंट बोर्डाने शानदार कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. विविध कॅन्टोनमेंट क्षेत्रांतील खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले.
या स्पर्धेत महिलांच्या गटात बेळगावच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवले. ४० वर्षांवरील गटातील महिला एकेरी प्रकारात आसिया ए. मुल्ला यांनी सुवर्णपदक जिंकले. त्याचप्रमाणे, महिला दुहेरी (४० वर्षांवरील) गटात आसिया ए. मुल्ला आणि फरीदा या जोडीनेही सुवर्णपदक पटकावले. ४० वर्षांखालील गटात सयली साजणे हिने महिला एकेरीत कांस्यपदक मिळवले, तर महिला दुहेरीत सयली साजणे आणि अर्पिता या जोडीने रौप्यपदकावर नाव कोरले.
या स्पर्धेत बेळगावसह पुणे, खडकी, झाशी आणि चेन्नई (सेंट थॉमस माउंट) कॅन्टोनमेंट क्षेत्रांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कडवी स्पर्धा असूनही बेळगावच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत एकूण विजेतेपदावर आपला ठसा उमटवला. बेळगाव कॅन्टोनमेंट बोर्डाच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, खेळाडूंच्या मेहनतीचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे फलित मानले जात आहे.




