बेळगाव नॉर्थ रोटरी क्लबच्या नव्या अध्यक्षपदी पांडुरंग धोत्रे अधिकार ग्रहण सोहळा

बेलगाम प्राईड/ रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा बेळगाव येथील मेसॉनिक लॉजमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा गव्हर्नर डॉ. लेनी डी’कोस्टा यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन कार्यकारिणीची अधिकृत निवड करून त्यांच्याकडे जबाबदारी सुपूर्द करण्यात आली.
बेळगाव येथील कॅम्प भागातील मेसॉनिक लॉजमध्ये रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थच्या वर्ष २०२६-२७ च्या नवीन समितीचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात रोटरी जिल्हा गव्हर्नर डॉ. लेनी डी’कोस्टा यांच्या हस्ते आरटीएन. पांडुरंग धोत्रे यांना अध्यक्षपदाची अधिकृत सूत्रे प्रदान करण्यात आली. याच कार्यक्रमात आरटीएन. डॉ. सुभाष आर. पाटील यांनी सचिवपदाची तर आरटीएन. दुर्गेश आर. हरितांय यांनी खजिनदारपदाची सूत्रे स्वीकारली.
अध्यक्ष आरटीएन. पांडुरंग धोत्रे हे सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी अनेक प्रतिष्ठित संस्थांचे नेतृत्व केले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी रोटरीच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, युवक विकास आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये व्यापक सामाजिक उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली. पारदर्शक आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीद्वारे क्लबला अधिक समाजाभिमुख बनवण्यासाठी संपूर्ण टीम कटिबद्ध असल्याचे आरटीएन. पांडुरंग धोत्रे यांनी सांगितले.
समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून आगामी वर्षात रोटरी क्लब समाजोपयोगी उपक्रमांना अधिक गती देईल, असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी रोटरीचे विविध सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




