
गोकाक धबधब्याच्या वरुन रोपवे निर्मितीला सरकारची मंजुरी
BelgaumPride -July 14, 2026
बेलगाम प्राईड/ गोकाक धबधब्यावर रोपवे निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले असून, वित्त विभागाने या योजनेला मंजुरी दिली आहे. या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता पर्यटन मंत्री के. जे. जॉर्ज यांनी व्यक्त केली आहे.
गोकाक परिसराला राज्याचे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प आखण्यात आला आहे. रोपवेच्या निर्मितीमुळे पर्यटन क्षेत्राला नवीन उभारी मिळणार असून स्थानिक व्यवसाय, रोजगार आणि आर्थिक घडामोडींना गती मिळण्यास मदत होईल असे सांगण्यात येत आहे.
या रोपवे प्रकल्पाची पूर्तता व्हावी यासाठी या भागाचे आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. आता हा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आल्यामुळे गोकाक परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीनंतर कामाला सुरुवात होणार असून, गोकाकच्या पर्यटन विकासात हा प्रकल्प एक नवा मैलाचा पर्यटन स्थळ ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.




