Uncategorized
Trending

लग्नाचे आमिष दाखवून ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक लूट; बेळगावात धक्कादायक प्रकार उघड

बेलगाम प्राईड/ सोशल मीडियावरून ओळख करून घेत तरुणीवर अत्याचार करत तिची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात, ईश्वरसिंग प्रेमसिंग बडपुजे (वय अंदाजे) याने २०१९ साली इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका तरुणीशी संपर्क साधला. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात करत त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार करून तिचे खासगी फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याचे तपासात समोर आले आहे.

यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेकडून वेळोवेळी मोठ्या रकमेची मागणी केली. या प्रकारात पीडित तरुणीच्या वडिलांच्या मालमत्तेतून सुमारे ८ लाख रुपये, एफडीमधून सुमारे ७ लाख रुपये रोख रक्कम आणि अंदाजे १५० ग्रॅम सोन्याची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या छळानंतर अखेर पीडित तरुणीने पुराव्यासह शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याऐवजी तडजोडीसाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोपही पीडितेने केला आहे.

दरम्यान, आरोपीने फसवणूक केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून लग्नासाठी तब्बल ३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, आरोपी सध्या आणखी एका तरुणीला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या तातडीने अटकेची मागणी केली होती. वकील मंदाकिनी अप्पुगोळ यांनीही आरोपीवर कठोर कारवाई करून पीडितेचे सुमारे १९ लाख रुपये परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी ईश्वरसिंग प्रेमसिंग बडपुजे याला शहापूर पोलिसांनी सोमवारी अटक केली. पीडितेने पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतल्यानंतर तपासाला वेग आला आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!